याबाबत अधिक माहिती अशी की, वैष्णवी दिगांबर कदम ही हदगाव तालुक्यातील साप्ती या छोट्याश्या गावातील रहिवासी आहे. तिने एमएस इल्केट्रॉनिक्स आणि एमएसडब्लूची पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण करत असताना तिने हदगाव तालुक्यातील गोदावरी अर्बन बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली. सध्या ती बँकेत मॅनेजरपदी कार्यरत आहे. वैष्णवीचे वडील हे शेतकरी आहेत. आपले वडील शेतकरी असल्याने तिला लहानपणापासूनच शेतीची आवड होती.
मुलगी उच्चशिक्षित आणि बँकेत मोठ्या पदावर कार्यरत असल्याने तिला चांगली स्थळं येत होती. मोठ्या शहरातील डॉक्टर, इंजिनियर आणि शासकीय कार्यालयात चांगल्या पदावर कार्यरत असलेल्या मुलांनी लग्नासाठी मागणी घातली. मात्र, आलेली सर्व स्थळं नाकारत वैष्णवीने शेतकरी मुलासोबत लग्न करण्याचं ठरवलं. आपल्या आई वडिलांकडे तिने शेतकरी मुलासोबत लग्न करण्याचा हट्ट देखील केला.
आपल्या मुलीचा हट्ट पुरवत आई-वडिलांनी शेतकरी वर शोधला. रविवारी मोठ्या थाटात वैष्णवी विवाह यवतमाळ येथे पुसद येथील नितीन पाटील सोबत संपन्न होणार आहे. नितीन पाटील याच्याकडे १५ एकर शेती आहे. वैष्णवीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
शेतकरी मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल:
सध्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने सहजा सहजी होत नाहीत. सध्या शेतकऱ्यांना जो त्रास सहन करावा लागत आहे त्यामागे अनेक कारणे आहेत. आर्थिक परिस्थिती ह्या कारणाससुद्धा अनेक कारणे आहेत. आर्थिक कारणे स्वाभाविक आहेत, ते नकार देण्याचे एक भक्कम कारण आहे .
त्यासोबतच सामाजिक उपेक्षा कोणत्याही मुलीला नको असते. कोणालाच नको असते असे म्हणणे अजून योग्य ठरेल. काम करणे कष्ट करणे हे नको असेल तर अशा वेळी शेतकरी नवरा नको असतो. वैष्णवी कदमने उचललेले पाऊल हे कौतुकास्पद आहे. यामुळे आता शेतकरी मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.