२ जुलै रोजी दापोली तालूक्यातील विसापूर गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (वय ३४) हे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बेपत्ता झाला. दुसऱ्याच दिवशी ३ जुलै रोजी भरत भेलेकर यांची पत्नी सुगंधा भेलेकर या सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलांना शाळेत सोडायला जाते, असं सांगून बाहेर पडल्या. त्या आराध्य (वय ७) आणि श्री (वय ४) या आपल्या मुलांना मुगीज शाळा नंबर १ या जिल्हा परिषदेच्या शाळेत सोडायला गेल्या. पण अद्याप त्या परतल्याच नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भरत यांना घरातून निघून जाण्याची सवय आहे. ते यापूर्वी पण असेच बेपत्ता झाले होते. पण यावेळी पत्नी आणि दोन लहान मुलंही बेपत्ता झाल्याने सगळेच नातेवाईक आणि ग्रामस्थ चिंतेत असून त्यांचा शोधाशोध सुरू आहे.
या प्रकाराचा छडा लावण्यासाठी पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. उपनिरीक्षक दर्जाचे नेतृत्वाखाली नेमण्यात आलेले पथक या कुटुंबाच्या शोधार्थ रवाना झाले आहेत. लवकरच काही माहिती हाती मिळेल असा विश्वास पोलिसांना आहे. मात्र, याप्रकरणी अद्यापतरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपात तर नाही ना? याचाही तपास पोलिसांनी युध्दपातळीवर सुरू केला आहे.
दापोली तालूक्यातील विसापूर गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर हे दुपारी त्यांचा चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर यांच्यासोबत मंडणगड तालूक्यातील कुंबळे या ठिकाणी लाकडी पट्टी आणण्याकरता जात आहे, असं सांगून घरातून निघाले. ते अद्यापपर्यंत घरी परतले नाहीत. भरत भेलेकरच्या कुटूंबासह नातेवाई मित्र मंडळींनी सर्वत्र शोध घेवून देखील ते कुठेच न सापल्यामुळे अखेर दापोली पोलीस ठाण्यात भरत भेलेकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
भरत भेलकर बेपत्ता झाल्याच्या नेमक्या दुसऱ्याच दिवशी ३ जुलै रोजी भरत भेलेकर यांची पत्नी सुगंधा भेलेकर ह्या सकाळी मुलांना शाळेत सोडायला जाते असे सांगून बाहेर पडल्या. आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या सुगंधा भेलेकर या देखील घरी परतल्या नाहीत. आराध्य आणि श्री या चिमुकल्यांचा तसेच सुगंधा यांचा देखील सगळीकडे शोध घेण्यात आला. मात्र, ते तिघेही सापडलेले नाहीत. तिच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली, तरीही त्यांचा कोठेही ठावठिकाणा लागलाच नाही.
दूरध्वनीवरही संपर्क केला गेला, पण संपर्कच होत नसल्यामुळे अखेर सुगंधा भेलेकर बेपत्ता झाल्याची तर आराध्य व श्री या दोघा लहान बालकांचे अपहरण झाल्याची फिर्याद दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अज्ञात संशयीतांवर भा.द.वि.क. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस फौजदार मिलींद चव्हाण हे करत आहेत. तालुका पोलीस निरीक्षक अहिरे यांनी यासाठी खास एका पथकाची नियुक्ती केली आहे.