ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये फळविक्री करणारे गिरीश नंदाराम महाबरे (४६) यांनी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित हरडसह एका बुलेटचालकावर (क्र. एमएच १५, एफएस ९३१९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबरे हे मित्रासमवेत नाशिकमध्ये पूजेसाठी आल्यावर कारमध्ये सोबत असलेल्या पुजाऱ्याने पूजा साहित्य खरेदीचे कारण सांगून दुपारी एक वाजेच्या सुमारास बुलेटवर बसवून मेनरोड भागात नेले. बुलेटस्वाराने गप्पागोष्टी करीत महाबरे यांना बोलण्यात मग्न ठेवले. तेव्हा, त्यांनी चार लाख रुपये असलेली बॅग बुलेटच्या टाकीवर ठेवली. तितक्यात संशयित हरडने तेथे येऊन बॅग घेऊन एका गल्लीतून पोबारा केला. महाबरे त्याच्यामागे धावले पण, हरड हाती लागला नाही. मागे फिरल्यावर बुलेटस्वारही गायब झाला. त्यामुळे चोरी झाल्याचे महाबरे यांच्या लक्षात आले. त्यावरून त्यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठत फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिस संशयितांचा माग काढत आहेत.
नेमकं काय घडलं?
महाबरे हे त्यांचा मित्र सुधीर विठ्ठल रायकर (४०, रा. वांगणी, ठाणे) यांच्या समवेत नाशिककडे येण्यासाठी सकाळी निघाले. रायकरांची नारायण नागबली पूजा असल्याने त्यांनी एका पुजाऱ्याशी संपर्क केला होता. त्यानुसार कसारा घाटातून पुजारी हरड हा त्यांच्या कारमध्ये बसला. दरम्यान, महाबरे व रायकर यांच्या एका मित्राला चार लाख रुपये देण्यासाठी दोघांनी दोन लाख रुपयांची रक्कम एकत्र केली होती. ही रक्कम त्यांच्यासमवेत असलेल्या बॅगेत होती. याबाबत हरडने कारमध्ये ऐकले. नाशिकमध्ये पोहोचल्यावर पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी हरडने कार रविवार कारंजा परिसरात नेण्यास सांगितली. तेथे बुलेटस्वाराला बोलावून घेतले. बुलेटस्वार व हरडने महाबरे यांना बुलेटवर बसवून ‘ट्रिपल सीट’ मेनरोडच्या गल्लीबोळांत फिरवले. त्यानंतर हरड व बुलेटस्वाराने संगनमताने बॅग खेचून पोबारा केला.