मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमीयुगुल हे लोहा तालुक्यातील शेवडी बाजार येथील रहिवासी आहे. त्यांच्या प्रेमाला नातेवाईकांचा विरोध होता. आमच्या मुलीजवळ का बोलतोस या कारणाने सहा महिण्यापूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर ती तरुणी शिक्षणासाठी आपल्या मावशीकडे राहत होती. प्रियकर देखील नांदेड शहरात राहत होता. शुक्रवारी मुलीच्या नातेवाईकाने दोघांना एकत्र पाहिले. ही गोष्ट घरी माहिती होईल अशी भीती मुलीला होती. याच भितीने ती तरुणी घरून निघून गेली.
शनिवारी सकाळी दोघे जण दुचाकीने नावघाट उड्डाणपुलावरुन जात होते. यावेळी तरुणीने प्रियकराला गाडी थांबवायला सांगितले. त्यानंतर तीने उड्डाणपुलावरील लोखंडी कठड्यावर चढून गोदावरी नदीत उडी मारली. तिला वाचण्यासाठी तरुणाने देखील उडी मारली. मात्र दोघांना पोहता येतं नव्हते. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर तिथे असलेल्या जीवरक्षकांनी नदीमध्ये उडी मारून दोघांना सुखरूप बाहेर काढले. दोघांचे वय १८ ते २० असल्याचं सांगण्यात येतं आहे.
दरम्यान प्रेमीयुगुलाने गोदावरी नदीत उडी मारल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. बघ्याची गर्दी देखील जमली होती. मात्र तेथे कार्यरत असलेले जीवरक्षक सय्यद नूर आणि त्यांच्या पथकाने कुठलाही विलंब न होऊ देता नदीत उडी मारली आणि दोघांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे दोघांचे प्राण वाचले आहे. जीवरक्षकांच्या या धाडसाचे नागरिकांनी कौतुक केले. युवकाच्या पायाला मार लागला असून प्लास्टर करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असून युवकाने दिलेल्या माहितीवरून पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वीच लोहा तालुक्यातील भोपळवाडी येथे एका प्रेमीयुगलाने विष पिऊन आत्महत्या केली. यात उपचारादरम्यान, प्रेमिकेचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका प्रेमी युगुलाने आत्महत्येचे धाडस केले. या घटनांमध्ये प्रथमदर्शनी कौटुंबिक समस्या, घरच्यांचा विरोध यामुळे तरुणाई आपली जीवन यात्रा संपवत आहे. हे थांबविण्यासाठी आत्महत्येसंदर्भात समाजात जनजागृती करणे, व्यसनांपासून दूर राहणे, शाळा, महाविद्यालयांत समुपदेशक नेमणे, कौटुंबिक हिंसाचार थांबवणे आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारणे कौटुंबिक संवाद वाढविणे, आवश्यक आहे.