• Sat. Sep 21st, 2024

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र सरकारची मान्यता

ByMH LIVE NEWS

Jul 8, 2023
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र सरकारची मान्यता

मुंबई दि. ८ : परभणी येथील १०० विद्यार्थी क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी  संलग्न असलेल्या 430 रुग्णखाटांच्या रुग्णालयास केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश सुरू होणार आहे. राज्यातील हे 25 वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. गिरीष महाजन म्हणाले की,  स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास 60 वर्षात केवळ 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली होती. तर  2014 ते 2023 पर्यंत 9 वर्षात 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये राज्यात सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स तयार होवून राज्यभर आरोग्य सेवेचा विस्तार होणार आहे. परभणी येथील वैद्यकीय शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून मागील 9 वर्षातील 11 वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. तसेच ज्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नाहीत अशा 9 जिल्हांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये  सुरू होणार आहेत.

मागील 09 वर्षात 11 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचा अनोखा उपक्रम शासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानंकानानुसार 1000 लोकसंख्येमागे एक डॉक्टर आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीत राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांचे प्रमाण कमी आहे तरीही प्रत्येक नागरीकाला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण विभागातील तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील  बहुतांश डॉक्टरांची  पदे रिक्त असल्याने राज्यातील निमशहरी, ग्रामीण, दुर्गम, तसेच अतिदुर्गम भागातील लोकांना आरोग्य विषयक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे  दरवर्षी नवीन 100 प्रशिक्षित डॉक्टर राज्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी तयार होतील.  परभणी येथे 430 रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू झाल्यामुळे आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य विषयक चांगल्या सोईसुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सामान्य नागरिकांतून स्वागत केले जात असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed