मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशच्या शैक्षणिक वाटचालीसाठी त्याला पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे. या आठ वर्षीय गणेशने दिव्यांगत्वावर मात करुन जीवनाचा संघर्ष सुरु ठेवला आहे. त्याच्यावर उपचारासाठी मुख्यमंत्री उपचार कक्षाचे मंगशे चिवटे यांनी सर्व प्रकारच्या तपासण्या देखील केल्या. मात्र, गणेशच्या हातांवर कुठलेही उपचार होवू शकत नसल्याने त्याच्या शैक्षणिक वाटचालीसाठी त्याला हा पाच लाखाचा धनादेश देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणाऱ्या अनिल माळी यांच्या आठ वर्षाचा मुलगा गणेश माळी हा दुसरीच्या वर्गात शिकतो. मात्र नियतीने या गोंडस चेहऱ्याशी अनियती केलीय. आठ वर्षाच्या गणेशला जन्मापासुन दोन्ही हातच नाहीत. त्याला हात नसतांना देखील त्याने वयाच्या अवघ्या आठ वर्षात आपल्या अंपगत्वावार मात करत शिक्षणासाठी घेतलेली भरारी भल्या भल्यांना अचंभीत करणारी आहे.
बुद्धी आणि जिद्दीचा धनी असलेला हा गणेशची आर्थिक झोळी खाली असली तरी त्याचा जगण्याचा हा संघर्ष अनेकांना तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. चिमुकल्या वयात मायेची ममता मुकलेल्या या गणेशला मदतीची प्रतीक्षा होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशच्या शैक्षणिक वाटचालीसाठी त्याला पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे. त्याला शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळाल्याने हा गणेश आगामी काळात इतरांसांठी प्रेरणादायी लढा ठरेल.