आमदार प्रतिभा धानोरकर यांना गांधी कुटुंबियांनी भेटीसाठी बोलवले होते. ही भेट धानोरकर यांना बळ देणारी ठरली. धानोरकर यांना जवळ घेत सोनिया गांधी यांनी म्हटलं, मी अशा कठीण प्रसंगातून गेली आहे. राजीवजीचे निधन झाले, तेव्हा राहूल तुमच्या मुलांपेक्षा लहान होता. धीर सोडू नका. गांधी कुटुंबिय तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे सात्वंन केले.
सोनिया गांधींनी त्यांना मायेने जवळ घेतले. या प्रसंगाने धानोरकर गहीवरल्या. काँग्रेस नेते तथा माजी खासदार राहूल गांधी यांनीही धीर दिला. राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले. ते रुग्णालयात असताना आणि त्यांच्या निधनानंतर राहूल गांधी धानोरकर कुटुंबीयांच्या संपर्कात होते. आमदार धानोरकर यांना (शुक्रवार) भेटीसाठी दिल्ली येथे बोलवण्यात आले होते. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत आमदार प्रतिभा धानोरकर, त्यांचे दोन्ही पुत्र मानस आणि पार्थ, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रवीण काकडे उपस्थित होते. राहूल गांधी यांचीही उपस्थिती होती.
आमदार धानोरकर यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा सारा घटनाक्रम सांगितला. धानोरकरांच्या निधनानंतरची परिस्थिती कथन केली. त्यावेळी सोनिया गांधींनी त्यांच्यावरही अशीवेळ आली होती, याची आठवण करुन दिली. तुमच्या मुलांपेक्षाही तेव्हा राहूल लहान होते. मलाही खूप त्रास झाला, याची आठवण करुन दिली. आमदार धानोरकर आणि दोन्ही मुलांना मायेने जवळ घेतले. गांधी कुटुंबिय तुमच्या नेहमी पाठीशी राहीली. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधा, असे सांगितले.
राहूल गांधींनी स्वीय सहाय्यकाचा आणि स्वतःचा भ्रमणध्वनी आमदार धानोरकरांना दिला. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधण्यास सांगितले. मुलं लहान आहेत. राजकारण होतच राहील. त्यांची काळजी घ्या, असा सल्लाही दिला. आमदार धानोरकरांना सोनिया गांधींनी मायेने जवळ घेतले. तेव्हा त्यांचा भावनांचा बांध फुटला. सोनिया गांधी याचेही डोळे पाणावले. राज्यातील एकमेव खासदार असल्यामुळे धानोकरांचा सोनिया गांधीशी यांच्याशी थेट संपर्क होता.