• Sat. Sep 21st, 2024
Dombivli News: गुपचूप खेकडे पकडायचं सामान घेऊन ११ वर्षांचा कार्तिक तलावाजवळ गेला अन् घात झाला

डोंबिवली: डोंबिवलीच्या एकतानगरमधील एका ११ वर्षाच्या मुलाचा कल्याण पूर्वेतील मलंग रस्त्यावरील नांदिवली तर्फ गावातील तलावात बुडून मृत्यू झाला. रविवारपासून हा मुलगा बेपत्ता होता. बुधवारी दुपारी या मुलाचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला. त्याची ओळख पटविल्यावर तो डोंबिवलीचा रहिवासी असल्याचे उघड झाले, अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी दिली.

कार्तिक गोटीराम पवार (११) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचे आई-वडील कष्टकरी आहेत. कार्तिकला खेकडे पकडण्याची आवड होती. यापूर्वी तो नांदिवली तर्फ तलावात खेकडे पकडण्यासाठी जात होता. मुसळधार पाऊस सुरू असल्याने या दिवसात तलाव, शेतांमध्ये खेकडे अधिक संख्येने निघतात. हे कार्तिकला माहिती होते. त्यामुळे तो तलावाच्या काठावर खेकडे पकडायला गेला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पावसाळी पर्यटनाचा बळी! तलावात पोहण्यासाठी मारलेली उडी ठरली अखेरची, तरुणाचा दुर्दैवी अंत

पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी सांगितले, रविवारी सकाळी कार्तिकचे आई वडील कामाला निघून गेले. आई वडिलांना कोणीतीही माहिती न देता दुपारच्या वेळेत कार्तिक गुपचूप खेकडे पकडण्याचे सामान घेऊन मलंग रस्त्यावरील नांदिवली तर्फ तलावाकडे गेला. तेथे खेकडे पकडत असताना त्याचा तोल जाऊन तलावात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. कामावरून घरी परतल्यावर कार्तिक घरी नसल्याने पालकांनी त्याचा आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला. पण तो सापडला नाही. त्यामुळे कार्तिकच्या पालकांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात पालकांनी कार्तिक बेपत्ता असल्याची तक्रार केली. कार्तिकच्या मित्रांनाही तो कोठे गेला आहे हे माहिती नव्हते. टिळकनगर पोलीस, कार्तिकचे पालक दोन दिवस त्याचा शोध घेत होते. बुधवारी दुपारी नांदिवली तर्फ गावाजवळील आरटीओ वाहन तपासणी केंद्राजवळील तलावात एका मुलाचा मृतदेह तरंगत आहे, अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मदने यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार डोंबिवली, कल्याण परिसरातील कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल आहे याची माहिती घेतली. टिळकनगर पोलीस ठाण्यात अशी तक्रार दाखल असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली.

पाणी साठवण्यासाठी घरासमोर हौद बांधला, त्याच हौदात अनर्थ घडला; हसता खेळता चिमुकला गेल्यानं संपूर्ण कुटुंब सुन्न

पोलिसांनी मुलाच्या पालकांच्या घरी जाऊन त्यांना तलावाजवळ नेले. त्यांनी मृत मुलगा आपलाच असल्याचे सांगून हंबरडा फोडला. पाऊस सुरू झाला की कार्तिकला खेकडे पकडण्याची आवड होती. तो वेळ मिळेल तेव्हा या तलावावर येत होता, अशी माहिती पोलिसांना तो रहिवास करत असलेल्या भागातून मिळाली. कार्तिकचा मृत्यू नेमका तलावात जाऊन झाला की अन्य काही कारणामुळे याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed