२ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी शपथ घेतली. त्यावेळी शपथविधीला कोल्हे हजर होते. त्याच दिवशी कोल्हे अजितदादांना साथ देतील अशी चर्चा झाली. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी पवारांची भेट घेतली. मी तुमच्यासोबत राहिन, असा शब्द देतानाच भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर त्यांनी घणाघात केला. कोल्हे कोणत्या गटात जाणार याबद्दल मोठी चर्चा असताना आज मात्र ते शरद पवारांच्या बैठकीत सामील झाले.
- छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे चर्चेत आले
- २०१९ ला शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले.
- शिवाजीराव आढळराव पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धी असून त्यांच्यातील संघर्ष वेळोवेळी दिसून आलाय
- राज्यभरात राष्ट्रवादीच्या प्रचारसभांमध्ये कोल्हे हे महत्वाचे आकर्षण राहिले
- आपल्या करारी बाण्याने आणि निर्भीड वक्तृत्वाने लाखोंच्या सभआ जिंकल्या
- गेल्या काही महिन्यांपासून अमोल कोल्हे यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती
- पक्षाच्या महत्वाच्या कार्यक्रमाला त्यांची गैरहजेरी चर्चेत होती, ते भाजपसोबत जाणार याचीही जोरदार चर्चा होती
- त्यामुळे अजित पवारांच्या बंडानंतर ते त्यांच्यासोबतच राहतील अशी अपेक्षा होती
- मात्र कोल्हेंनी पवारांसोबत राहण्याची भूमिका घेतली आणि ते पुन्हा लाईमलाईटमध्ये आले
आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कोल्हेंनी शरद पवारांसमोर जोरदार भाषण करुन अजितदादांच्या गटातील नेत्यांवर शरसंधान साधलं. तसेच मतदारांचा तरी विचार करा, असंही सुनवायला मागे पुढे पाहिलं नाही.
आजच्या भाषणात अमोल कोल्हे काय म्हणाले?
“खरं तर बाहेर पाऊस खूप पडतोय. असं म्हणतात की पाण्याचा पाऊस पडला तर मातीचा मातीचा चिखल होते. आणि ईडी-सीबीआयच्या स्वार्थाचा पाऊस पडला तर निष्ठेचा चिखल होतो. हे आज महाराष्ट्रात बघायला मिळतं. त्या दिवशी मी स्वत: राजभवनात होतो. राजभवनातून फोन केला आणि सांगितलं माझा खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. सर्वसामान्य मतदारांनी जो विश्वास दिला, त्या विश्वासाचं काय? हा प्रश्न मनात होता. आज ठामपणे शरद पवारांच्या पाठिमागे उभा आहे. स्वाभिमानाची संस्कृती ही महाराष्ट्राची आहे.”
या सगळ्यानंतर जयंत पाटील यांनीही अमोल कोल्हे यांना त्यांच्या निष्ठेचं बक्षीस दिलं. आपल्या पक्षाचं प्रचारप्रमुखपद आपण स्वीकारा अशी ऑफरच जयंतरावांनी अमोल कोल्हेंना दिली. महाराष्ट्र पिंजून काढू, शिवरायांचा विचार सांगू, पुन्हा महाराष्ट्रात आपल्या विचारांचं सरकार आणू… असं जयंतराव म्हणाले. त्यावर कोल्हेंनीही चेहऱ्यावर स्मितहास्य आणून हात जोडून जसा आपला आदेश म्हणत त्यांची ही ऑफर मान्य असल्याचंच एकप्रकारे सांगितलंय. खरंच कोल्हे पवारांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादीला उभारी देतील का? कोल्हे हे आव्हान पेलतील का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.