• Fri. Nov 29th, 2024

    संग्रामभैय्या दादांसोबत पण नगरच्या भाजप कार्यकर्त्यांना ‘ती’ भीती, चिंतेने डोकं फुटायची वेळ!

    संग्रामभैय्या दादांसोबत पण नगरच्या भाजप कार्यकर्त्यांना ‘ती’ भीती, चिंतेने डोकं फुटायची वेळ!

    अहमदनगर : राज्यातील नव्या घडामोडींचे आता ठिकठिकाणी पडसाद उमटू लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांमुळे भाजपची गणिते काही ठिकाणी बिघडणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. अहमदनगर शहरात अशीच परिस्थिती आहे.

    राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत भाजप-सेना-राष्ट्रवादीकडून ही जागा त्यांना सोडण्याची वेळ आली तर… या शक्यतेने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघ प्रमुख भैय्या गंधे यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचं आवाहन केले आहे. काहीही झाले तर उमेदवार मूळ भाजपचा असेल, अशी ग्वाही गंधे यांनी दिली आहे.

    एका कार्यक्रमात बोलताना गंधे म्हणाले, राज्यात ज्या राजकीय घडामोडी होत आहेत, त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टीने दूरदृष्टीने हे निर्णय घेतले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विचलित होवू नये. खचून न जाता एकनिष्ठेने पक्षाचे कामे चालूच ठेवा. कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी नगरचा लोकप्रतिनिधी हा ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचाच होईल, अशी ग्वाही मी ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात देतो, असेही ते म्हणाले.

    पक्षाचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर म्हणाले, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचे व देशाचे हित पाहूनच योग्यच निर्णय घेतले असतील. प्रत्येक पक्षात संक्रमण काल येतोच. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

    यावेळी ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुवेंद्र गांधी, माजी उपमहापौर मालन ढोणे, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, बाबासाहेब सानप, प्रदीप परदेशी, अजय चितळे, श्रीगोपाल जोशी, बाळासाहेब भुजबळ, अजय ढोणे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed