• Mon. Nov 25th, 2024

    पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

    ByMH LIVE NEWS

    Jul 5, 2023
    पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

    • जिल्ह्यातील सहा तिर्थक्षेत्र क वर्ग म्हणून घोषित
    • जिल्ह्याला लवकरच मिळणार २०० ट्रान्सफार्मर
    • मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्या बांधकामाचा प्रस्ताव तातडीने सादर करा

    धुळे, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे शहरातील दैनंदिन घडमोंडीवर लक्ष ठेवणे तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक चांगल्या पध्दतीने राखण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यास मंजुरी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक विनाअडथळा वीज उपलब्ध व्हावी, याकरीता 200 ट्रान्सफार्मर खरेदीची कार्यवाही लवकरात लवकर करणे, त्याचबरोबर जिल्ह्यात पर्यटन वाढीस लागावे याकरीता जिल्ह्यातील सहा तिर्थक्षेत्र क वर्ग तिर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याबरोबरच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्या बांधण्याचा प्रस्ताव सादर तातडीने सादर करण्याच्या सुचना राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांनी आज दिल्यात.

    जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री ना. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती अश्विनी पवार, आमदार किशोर दराडे, आमदार काशिराम पावरा, आमदार कुणाल पाटील, आमदार श्रीमती मंजुळाताई गावीत, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. जानगर यांच्यासह लोकप्रतिनिधी, नियोजन समितीचे सदस्य, सर्व विभागप्रमुख ऑनलाईन उपस्थित होते.

    पालकमंत्री श्री. महाजन पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे याकरीता त्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरीता मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे एक महिन्याच्या आत सर्व्हेक्षण करा, त्या खोल्या निर्लेखित करुन नवीन वर्ग खोल्या बांधण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह व पिण्याचे पाण्याच्या व्यवस्था करण्याची सुचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात. धुळे शहराला अक्कलपाडा योजनेने पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, धुळे शहरातील घडामोंडीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याच्या 2 कोटी 69 लाख रुपयांच्या खर्चास आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अमोदे  येथील श्री गजानन महाराज मंदिर, सावळदे येथील श्री महादेव मंदिर,  शिंदखेडा तालुक्यातील दभाषि येथील श्री. शनिदेव मंदिर, कर्ले येथील श्री धनदाई माता मंदिर, सुराय येथील श्री. विठ्ठल मंदिर आणि साक्री तालुक्यातील आयने येथील श्री. महादेव मंदिर या तिर्थक्षेत्रांना क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. शिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक विनाअडथळा वीज उपलब्ध व्हावी, याकरीता 200 ट्रान्सफार्मर जिल्हा नियोजन समितीच्या खर्चातून खरेदी करण्यास यापूर्वीची मंजूरी देण्यात आली आहे. ही खरेदीची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिली.

    खरीप हंगामास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना बी-बीयाणे व खतांची कमतरता भारसणार नाही याची दक्षता घ्यावी, बोगस बियाणे विक्रीवर आळा घालावा, बोगस बियाणे विक्री आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्याची सुचनाही त्यांनी केली.

    या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती पवार यांनी जिल्हा परिषदेस तर महापौर यांनी महानगरपालिकेस निधी वाढवून मिळावा, आमदार श्री. दराडे यांनी जिल्ह्यातील शाळेच्या वर्ग खोल्यांचा प्रश्न मांडला, आमदार कुणाल पाटील यांनी ट्रान्सफार्मर खरेदी, आमदार श्रीमती गावीत यांनी साक्री तालुक्यातील नवनिर्मित ग्रामपंचायतीसाठी कार्यालये बांधणे, आमदार श्री. पावरा यांनी शिरपुर तालुक्यातील बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच रस्त्यांचा प्रश्न मांडला. तसेच इतर सदस्यांनीही उपयुक्त सुचना केल्यात.

    बैठकीच्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी जिल्हा विकास आराखडा तयारीबाबत सांगितले तसेच सन 2022-23 मध्ये झालेल्या खर्चाची तसेच सन 2023-24 मध्ये उपलब्ध निधी, वितरीत केलेला व खर्च झालेलया निधीची माहिती दिली. तसेच विहित कालावधीत मंजूर कामे पूर्ण करणे व निधी खर्चाचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.

    जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती हटकर यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविले. तसेच आतापर्यंत प्राप्त निधी व खर्चाची माहिती दिली.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *