मिळालेल्या माहितीनुसार, गुडूलाल मशाक शेख (३९), सिराज नजीर पटेल या दोघांना जबर मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. गुडूलाल मशाक शेख यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार १ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ते आहेरवाडी येथील शेतात आपल्या कुटुंबासह होते. गावातीलच काही तरुण आले आणि गोवंश हत्या करण्याच्या कारणावरून जाब विचारत शिवीगाळ करू लागले. यावेळी गुडूलाल शेख यांनी चूक झाली माफ करा असे सांगत असताना देखील गुडूलाल आणि सिराज पटेल यांना लाकडाने, लोखंडी सळईने मारहाण करण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी तक्रार जखमी गुडूलाल शेख यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणात संगमेश्वर महादेव बम्मंणगे, पंचनाथ चंद्रकांत दिंडुरे, बसवराज नागनाथ बोरेगाव, राकेश सुभाष मुगळे, संतोष हणमंत माळी, सचिन शामराव सासवे, बसवराज प्रभू पिशानतोट, शुभम दिंडुरे, विजय कापसे, महेश बोरुटे, बाबूराव हडपद, सागर अडवीतोट, उमेश बम्मंणगे, सिद्राम अमाती हदरे, पंचनाथ क्षेत्री, राजू क्षेत्री यांच्या विरोधात भा.द.वि. १४३,१४७,१४९,३२४,२९४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
घडलेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून वळसंग पोलीस ठाण्यात आहेरवाडी या गावात गायीची कत्तल केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस ठाण्यात दाखल कलमानुसार एकूण सहा जणांनी गोवंश कत्तल केली आहे. अशा आशयाची फिर्याद वळसंग पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अमोल माणिक यादव यांनी दिली आहे. गुडूलाल मशाक शेख (३९), सिराज नजीर अहमद पटेल (२८), असिफ दौलत बागवान (३०), जब्बार सलाउद्दीन काजी (३२), सैपन सलाउद्दीन काजी(२९), जहीर बशीर शेख(३३) यांवर गाय कापल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ११,५,५,(सी) ९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.