बंडानंतर अजित पवारांसोबत दिसलेले अतुल बेनके यांच्या व्हॉट्स ऍप डीपीवर शरद पवारांसोबतचा फोटो आहे. त्यामुळे बेनके अजित पवारांना साथ देणार असल्याचे संकेत दिले. बेनके कुटुंबाला पवारांनी ४० वर्षे विधानसभेचे तिकीट दिले आहे. त्यामुळे बेनके शरद पवारांशी एकनिष्ठ राहतील, असे मानले जाते. व्हॉट्स ऍप डीपीला शरद पवारांसोबतचा डीपी लावणारे बेनके कार्यकर्त्यांशी बोलून भूमिका सांगू म्हणत असल्याने संभ्रम कायम आहे.
तर दुसरीकडे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मात्र आपण शरद पवारांसोबत असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉ. कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे खुद्द शरद पवारांनी त्यांना तुम्ही कामाला लागा असे सांगितले. कोल्हे यांना पुन्हा खासदारकीचे तिकीट देण्याचे सूतोवाच शरद पवारांनी केले होते. त्यामुळेच कोल्हे पवारांसोबत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे यांनी सांगितले की, शरद पवार आमचे राजकीय दैवत आहेत. तर अजित पवार हे धडाडीचे नेते आहेत. परंतु ही भूमिका मी एकटा जाहीर करू शकत नाही. आमदारांसह तालुक्यातील सर्वांचा एकत्रित विचार काय ठरेल, त्यानुसार निर्णय जाहीर करू असे त्यांनी सांगितले.
दरम्यान जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी सध्या तर तालुक्यात कार्यकर्त्यांशी संपर्क अभियान सुरु आहे. नक्की कोणासोबत राहायचं आहे, याची चाचपणी केल्यानंतर याबाबत बोलता येईल, असे सांगून त्यांनी भूमिका स्पष्ट करण्यास नकार दिला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊ देवाडे यांनी आम्ही आमदार ठरवतील तीच आमची दिशा असेल असे सांगितले.
नेत्यांच्या अडचणीचे कारण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्ष फुटीनंतर लगेचच राज्याचा दौरा सुरू केला. त्यात त्यांनी शिवनेरी ते रायगड यात्रा काढण्याची घोषणा केली. या यात्रेचा प्रारंभच जुन्नरच्या शिवजन्मभूमीतून होणार आहे. त्यामुळे प्रथमत: येथे उपस्थिती तर दाखवावी लागेल. मग आताच भूमिका कशी सांगायची ही अडचण झाल्याने जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वच नेत्यांची सध्या तरी कोणासोबत हे सांगण्याबाबत गोची झाली आहे.