शाहूवाडी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील गजापूरपैकी दिवाणबाग येथे दगडू सखाराम चौगुले (वय ७०) आणि पत्नी लक्ष्मी चौगुले (वय ६०) राहत होते. लक्ष्मी यांचे माहेर हेच गाव असून त्यांना दोन मुले आहेत. दोघेही मुंबईला नोकरीनिमित्त राहतात. घरी दगडू आणि लक्ष्मी दोघेच राहतात. दगडू कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पत्नी लक्ष्मी चौगुले ही जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात दगडूने लक्ष्मीच्या मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर कोयत्याने वार करून खून केला.
खून उघडकीस येऊ नये म्हणून संशयित दगडू चौगुलेने रात्रीच घरामागील परिसरात खड्डा खणून मृतदेह पुरला. तर लक्ष्मी चौगुले यांच्या शरीरावर वार करताना घराच्या भिंतींवर जमिनीवर पडलेले रक्ताचे सडे शेणाने सारवून डाग पुसून टाकले. दरम्यान, आपल्या आईशी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून फोनवर बोलणं होत नसल्याने मुलगा गणेश याला संशय आला आणि तो सोमवारी मुंबईहून घरी आला. यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
त्याने थेट शाहूवाडी पोलिसांत वडील दगडू चौगुले यांच्याविरोधात खुनाची फिर्याद दाखल केली. तसेच, लक्ष्मी यांचा पुरलेला मृतदेह दुपारी बाहेर काढून आंब्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथेच शवविच्छेदन केले आणि सायंकाळी अंत्यसंस्कार केले.तर दगडू चौगुले याच्याविरोधात ३०२ व २०१ या कलमान्वये शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास सायंकाळी अटक केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.