राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या या खेळीचा परिणाम राज्याच्या राजकारणावरच नव्हे तर मंत्रिमंडळावरही झाला आहे. मंत्रिपद हव्या असलेल्या जिल्ह्यातील नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या दावेदारांमध्ये अस्वस्थता पसरताना दिसत आहे. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर राजकारण झपाट्याने बदलले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता आली. यानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले.
अजित पवार यांनी आता दुपारचा कार्यक्रम केला. फरक एवढाच आहे की, यावेळी त्यांचा डाव फसणार नाही असे बोलले जात आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. अजित पवारांच्या या बंडखोरीबाबत विविध राजकीय चर्चा रंगत आहेत. त्याचे परिणाम भविष्यात दिसून येतील. अजित पवारांच्या खेळीमुळे त्यांचे समर्थक आनंदी आहे. त्याचबरोबर अनेकांचे स्वप्न भंगणार आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. त्या विस्तारात नागपूर जिल्ह्यातील एक-दोन आमदारांचा समावेश असल्याची चर्चा होती.
प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, समीर मेघे यांच्यापैकी एकाला संधी मिळणार, अशी दबक्या आवाजात चर्चा भाजपमध्ये होती. तसेच शिवसेनेकडून (शिंदे गट) आशिष जैस्वाल हे निश्चित मंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदारांनी सत्ता वाटून घेतली. रविवारी त्यांच्यासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे नजीकच्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असला तरी मंत्रिपद कोणाला मिळणार हे येणारा काळच ठरवेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच त्यांच्या समर्थक मंत्री आणि आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. सभापतींचा निर्णय विरोधात गेल्यास सर्व सदस्यांचे सदस्यत्व गमवावे लागेल. अशा स्थितीत नागपूरच्या आमदारांना संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.