आवक घटल्यामुळे सध्या बाजारपेठेत जवळपास सर्वच भाज्यांनी ८० ते १०० रुपये किलो असा टप्पा गाठलेला आहे. दुसरीकडे विविध प्रकारच्या रानभाज्या ३० ते ५० रुपये जुडी किंवा किलोप्रमाणे विक्री होत आहे. आयुर्वेदिकदृष्ट्या या भाज्या शरीरासाठी पोषक असल्याने ग्राहकांकडूनही पसंती मिळत आहे. यामध्ये रानतेरा, आकऱ्या, उळसा, करटुले, आंबटवेल, कोळू, कांचन, दिंडा, रान ज्योत, भरडा, भारंग, माठभाजी, आळू, करडू, दिंड, आंबड अशा अनेक राजभाज्यांनी शहरातील भाजीबाजारात मागणी वाढली आहे. शहरात सद्यस्थितीला त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, हरसूल या आदिवासी भागांतून रानभाज्यांची नाशिकमध्ये आवक वाढली आहे. रानभाज्यांची मागणी वाढल्याने आदिवासी बांधवांनाही रोजगार मिळालाा आहे.
भाज्या कडाडल्या
गेल्या अनेक महिन्यांपासून टोमॅटोचे दर प्रचंड कोसळले होते. मात्र, आता पावसाळा सुरू झाल्यानंतर दरांत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे दरही किरकोळ बाजारात १० ते २० रुपये किलोप्रमाणे विक्री होणारे टोमॅटो आता १०० रुपये किलोने विक्री होत आहे. याउलट बाजारात मेथीची मोठी जुडी ६० ते ७० रुपयांना तर लहान जुडी ३५ ते ४० रुपयांना मिळतेय. याचबरोबर कोथिंबीर जुडीही २० ते ४० रुपयांना विक्री होत आहे.
हलवा आणि सुरमई महागले
पावसामुळे शहरात राज्याच्या विविध भागातून येणारी मासळीची आवक बंद असली तरीही परराज्यांतील आवक वाढली आहे. त्यामुळे मच्छी बाजारात हलवा आणि सुरमई महागले आहेत. मासळीच्या दरांत २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. बाजारात सुरमई आणि हलवा ८०० ते १ हजार रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
…असे आहेत दर (किलो-रुपये)
भाजी | बाजार समिती | गंगापूर रोड | जत्रा हॉटेल |
वांगी | ४० | ८० | ६० |
भेंडी | ४० | ८० | ६० |
गवार | ८० | १२० | ११० |
हिरवी मिरची | १०० | १६० | १२० |
टोमॅटो | ७० | १२० | १०० |
मेथी | ५० ते ६० (मोठी जुडी) | ५० | ४० |
शेपू | ३५ ते ४० (मोठी जुडी) | ४० | ३५ |
पालक | ८ ते १० (मोठी जुडी) | २० | १५ |
कोथिंबीर | १०० ते १२० (मोठी जुडी) | २० | २० |