समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातात पिंपळे सौदागर येथील रहिवासी परिणीत वनकर यांची आई, पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी वाहिन्यांवरील बातम्या पाहून सोसायटीतील रहिवाशांना ही माहिती कळली. त्यानंतर सर्वांनीच परिणीत यांच्या घरी धाव घेतली. मात्र, परिणीत यांचे घर बंद होते. परिणीत यांच्या शेजारी राहणारे त्यांचे मित्र सागर बिरारी यांनी दबकतच परिणीत यांना फोन लावला. मात्र, परिणीत बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते रडत होते. आपल्याला समजलेली बातमी खरी आहे, हे कळताच सोसायटीतही अनेकांनी हंबरडा फोडला. परिणीतचे मित्र, त्यांच्या पत्नीच्या मैत्रीणी, आईच्या भजनी मंडळातील महिला सर्वांनीच हंबरडा फोडला. कोणालाच काय करावे, हे कळत नव्हते. एका क्षणात आमचा परिणीत पोरका झाला, त्यांचा सोन्यासारखा संसार जळून खाक झाला, एवढा एकच टाहो सोसायटीतील ज्येष्ठ महिलांनी फोडला.
समृद्धी महामार्गावरील अपघातात परिणीत यांची आई शोभा वनकर (वय ६०), पत्नी वृषाली वनकर (वय ३८) आणि मुलगी ओवी (वय २ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. परिणीत यांना शुक्रवारी रात्री उशिरा ही गोष्ट कळाल्यानंतर ते आपल्या मेहुण्यासोबत अपघातस्थळी रवाना झाले. सकाळी टीव्हीवरील बातम्यांद्वारे अपघाताची घटना शेजाऱ्यांना कळली. त्यांचे मित्र आणि शेजारी सागर बिरारी यांनी त्यांना फोन लावाला. तेव्हा याला दुजोरा मिळाला.
परिणीत वनकर कुटुंबासह २०१४मध्ये जरवरी सोसायटीमध्ये राहण्यासाठी आले. ते एका मोठ्या कंपनीत नोकरी करतात. त्यांची पत्नी वृषाली या गृहिणी आहेत, तर आई ज्येष्ठ नागरिक असून, भजनी मंडळाच्या सदस्य आहेत. दोन वर्षांपूर्वी परिणीत यांचे वडील करोनामुळे वारले.
वनकर कुटूंब खूप चांगले होते. परिणीतची आई, पत्नी, मुलगी या सर्वांचाच स्वभाव खूप चांगला होता. ओवी तर दुडूदुडू पळत सर्वांच्या घरात यायची. मात्र, आता ती पुन्हा कधीच दिसणार याचे खूप दुःख होत आहे.
– इंदू रामटेके, शेजारी
पंधरा-वीस दिवसांपूर्वीच वनकर कुटुंबीय नागपूरला गेले होते. नातेवाइकांचे लग्न आणि सुट्टीसाठी सर्व जण गेले होते. परिणीत आठ दिवसांपूर्वी सोसायटीत आला. आम्ही रोज भेटत होतो. शनिवारी सर्व येणार आहेत. असेही त्याने सांगितले होते. मात्र, शनिवारी सकाळीच ही धक्कादायक घटना घडल्याचे कळाले.
– सागर बिरारी, शेजारी
