• Mon. Nov 25th, 2024

    दत्तक घेतलेल्या लेकीला घेऊन प्रवासाला निघाले, बुलढाणा अपघातात लहानग्या ओवीसह आई-आजीचा मृत्यू

    दत्तक घेतलेल्या लेकीला घेऊन प्रवासाला निघाले, बुलढाणा अपघातात लहानग्या ओवीसह आई-आजीचा मृत्यू

    चेतन व्यास, वर्धा: बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला. यावेळी बस उलटून डिझेल टँक फुटली आणि बसला भीषण आग लागली. बसमधून बाहेर पडण्याची संधी मिळण्यापूर्वीच बसमधील प्रवासी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि तब्बल २६ जणांचा आपला जीव गमवावा लागला. यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. या घटनेने संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये लहान चिमुरडीचाही समावेश आहे.

    दत्तक घेतलेल्या ओव्हीसह आई अन् आजीही झाली गतप्राण

    बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याच्या पिंपळखुटा गावानजीक झालेल्या भीषण अपघातात वृषाली वनकर, शोभा वनकर आणि ओव्ही वनकर या तिघांचाही मृत्यू झाला आहे. याच बसमधून प्रवास करत असलेला तेजस पेकळे हा मृतक वृषाली वनकर यांचा मामे भाऊ होता. या अपघातात तेजसचाही मृत्यू झाला आहे. शोभा वनकर या वृषालीच्या सासू आहेत. तर सुमारे एक वर्ष वयोगटातील ओवी हिला वृषाली आणि वृषालीच्या पतीने काही महिन्यांपूर्वी दत्तक घेतले होते, असे सांगण्यात आले.

    लाडकी लेक पुण्याला निघाली, अपघाताचं समजताच माऊलीचा एकच टाहो; म्हणाली, मला तिच्याकडे घेऊन चला
    साखर झोपेत असताना अचानक बस उलटली आणि पेटली

    बुलढाण्यात शनिवारी मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास भीषण अपघात झाला. ही बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने जात होती. यामध्ये अनेक तरुण होते हे नोकरीसाठी पुण्यात जात होते. या बसमधून प्रवास करत असलेल्या ३३ जणांपैकी अपघातात २६ प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे.
    ही दुर्दैवी घटना बुलढाण्याच्या सिंदखेडा येथील पिंपळखुटा भागात घडली. अपघातात बस चालक आणि बस क्लिनर बचावले आहेत. बसमध्ये अधिकतर प्रवासी नागपूरमधले, तर काही वर्धा आणि यवतमाळचे असल्याची माहिती आहे. ही विदर्भ ट्रॅव्हल्सची एसी स्लीपर कोच बस होती. शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही बस नागपूरवरुन पुण्यासाठी निघाली होती.

    टायर फुटल्यानं बसचा अपघात झाल्याची शक्यता; सिंदखेडराजा बस अपघाताबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

    अपघात कसा झाला?

    समृद्धी महामार्गावर एका लोखंडी खांबाला ही बस धडकली आणि त्यानंतर ती दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर बस लोखंडी खांबापासून १०० फूट दूर जाऊन उलटली. बस पलटी झाल्याने डिझेल टँक फुटला आणि बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. ड्रायव्हरने बसचे टायर फुटल्याचीही माहिती दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *