खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे निश्चितच पेरण्यासुद्धा दरवर्षीच्या तुलनेत उशिराने होणार आहेत. पेरणीसाठी बहुतांश शेतकऱ्यांची महाबीजच्या बियाण्याला पहिली पसंती असते. मात्र मागील दोन वर्षांपासून सोयाबीन कापणीच्या वेळी अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे महाबीजने बियाणे तयार करण्यासाठी लावलेल्या प्लॉटमधील सोयाबीनलाही या अवकाळी पावसाचा फटका बसला.
महाबीजचे अपेक्षित बियाणे तयार होऊ शकले नव्हते. परिणामी शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी खासगी कंपन्यांच्या बियाण्यांवर अवलंबून राहावे लागले होते. शेतकऱ्यांना आर्थिक झळही सहन करावी लागली होती. यंदा पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याने शेतकरी सुखावला आहे. कृषी केंद्रांपुढे बियाण्यांसाठीच्या रांगा संपल्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
ढेपाळलेल्या कारभाराला गती
मध्यंतरीच्या काळात महाबीजला व्यवस्थापकीय संचालक प्रभारी असल्याने कारभार ढेपाळला होता. गेल्या वर्षी सचिन कलंत्रे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक झाले. त्यांनी महाबीजच्या कामकाजात काही प्रमाणात सुधारणा केली. कलंत्रे पूर्वी अकोल्यातच असल्याने त्यांना या भागातील शेती व शेतकऱ्यांच्या समस्या माहिती होती. योग्य ते निर्णय घेण्यास मदत झाली.
तृणधान्य वर्षानिमित्त प्रोत्साहन
यंदाचे वर्ष हे सरकारने ‘राष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. देशात तृणधान्य पेरण्याचे प्रमाण वाढायला हवे, यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बाजरी, ज्वारी, नाचणी, कोदो, राळा यासारख्या तृणधान्याची शेतात किमान एक किंवा दोन गुंठे पेरा शेतकऱ्यांनी करावा, त्यासाठी महाबीजने साडेसतरा लाख लहान स्वरुपातील पाकीट राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडे उपलब्ध करून दिले आहे. शंभर ते दोनशे ग्रॅम तृणधान्यच्या बियाण्यांचे हे पाकीट आहेत, अशी माहिती महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी दिली.
पीकनिहाय उपलब्धता (आकडे क्विंटलमध्ये)
- सोयाबीन : १,६४,०००
- धान : ४२,०००
- तूर : ५,७००
- उडीद : ३,७००
- मूग : ७८०
- ज्वारी : ६००
- बाजरी : ५५०
एचटीबीटीचे क्षेत्र ३० टक्के
कापसाच्या प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांच्या पेरणीला परवानगी देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या बियाण्यांची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण, विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याने चोरट्या पद्धतीने यांचा व्यवहार होत आहे. विदर्भाचा विचार करता एकूण लागवड क्षेत्राच्या सुमारे ३० टक्क्यांवर या बियाण्यांची पेरणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.