• Sat. Sep 21st, 2024
घटनास्थळ नागपूर नाही, म्हणून तक्रार नाही; इराकमधील बोगस डिग्री घोटाळ्याप्रकणी नागपूर विद्यापीठ चिडीचूप

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नावावर बोगस पदवीच्या आधारे इराकमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या २७ विद्यार्थ्यांच्या प्रकरणात विद्यापीठाने ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. इराकच्या विद्यार्थ्यांनी केवळ नागपूर विद्यापीठाचे नाव वापरले, त्यांनी येथे कधीही शिक्षण घेतले नाही. याप्रकरणी नागपूर घटनास्थळ नसल्याने तक्रार केली जाणार नसल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बोगस डिग्रीप्रकरणी अंबाझरी पोलिसांच्यावतीने विद्यापीठाकडे पत्र पाठविण्यात आले. विद्यापीठाचा लोगो, नाव आणि कुलगुरूंची स्वाक्षरी असलेल्या २७ पदव्या आणि बोगस प्रमाणपत्रे तयार करण्यात कुणी स्थानिक व्यक्ती सहभागी असल्याचा संशय आहे का, अशी विचारणा या पत्रात करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठाच्या हद्दीत ही घटना घडली नसल्याने पोलिसांत तक्रार करण्यास विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे.

तीन वर्षांपूर्वीचं प्रकरण नागपूर पोलिसांना पडलं भारी; आता भरणार अडीच लाखांचा दंड
‘इराकच्या दुतावासातून मागविण्यात आलेली संपूर्ण माहिती आम्ही पुरवली असून पुढील कारवाई करण्याचा त्यांना अधिकार आहे. याबाबत विद्यापीठाच्यावतीने केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला कळविण्यात आले आहे. संबंधित विभागांकडून काही आदेश आल्यास पुढील कारवाई केली जाईल,’ अशी माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यानी दिली आहे. याप्रकरणी साकोलीमधील ज्या कॉलेजचे नाव पुढे येत आहे, त्यावर विद्यापीठाने आधीच कारवाई केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘इराक सरकार करेल कारवाई’

‘बोगस डिग्रीप्रकरणी सर्व माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्यामार्फत इराक सरकारला पाठविण्यात आलेली आहे. इराक सरकार स्थानिक कायद्यानुसार त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणार आहे. चौकशीदरम्यान नागपूर विद्यापीठातील अधिकारी किंवा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजमधील कर्मचाऱ्यांचे नाव पुढे आले तर विद्यापीठ कारवाई करेल,’ असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

परतीच्या प्रवासात वारकऱ्यांचे प्रचंड हाल; रेल्वेतील भयानक गर्दीमुळे श्वास घेता येईना, कोचमध्ये…
इतर देशांमधूनही येऊ शकतात प्रकरणे?

बोगस डिग्रीप्रकरणी नागपूर विद्यापीठाचेच नाव का वापरले गेले, याबाबत विद्यापीठ प्रशासनाने मौन बाळगले आहे. इराक आणि इतर आखाती देशांमध्ये नागपूर विद्यापीठाचे नाव वापरले जात असल्याची आणखी प्रकरणे पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र, जोवर तक्रार येत नाही तोवर आम्ही काहीही करू शकत नाही, असे विद्यापीठ प्रशासन सांगत आहे. ‘जगभरात कुठे विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर होत असेल तर त्याची जबाबदारी आम्ही कशी घ्यायची,’ असा सवाल अधिकाऱ्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed