• Mon. Mar 16th, 2026
    Raigad Politics : रायगडमध्ये सत्तेची रणधुमाळी; 11 मार्चला सभापती तर 12 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड

    रायगडमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. येत्या 11 मार्चला जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. तर 12 मार्चला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महत्त्वाच्या पदांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुढील दोन दिवसांत पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद स्तरावर महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. येत्या बुधवारी ११ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर गुरुवार, १२ मार्च २०२६ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

    पंचायत समिती सभापती पदासाठी विविध पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी सुरू असून सदस्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे. बहुमताचे गणित जुळविण्यासाठी पक्षांच्या नेत्यांकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. काही ठिकाणी एकापेक्षा अधिक इच्छुक असल्याने पक्षांतर्गत चर्चाही रंगू लागल्या आहेत. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरही सत्तेसाठी चुरस निर्माण झाली आहे. सभापती पदाच्या निवडीनंतर पंचायत समित्यांमधील पुढील कामकाजाची दिशा ठरणार असल्याने या निवडीकडे स्थानिक राजकारणाचे लक्ष लागले आहे.

    दरम्यान, १२ मार्च रोजी होणाऱ्या रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद हे ग्रामीण विकासाचे महत्त्वाचे केंद्र मानले जात असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडीत कोणत्या पक्षाच्या सदस्याला नेतृत्वाची संधी मिळते आणि जिल्हा परिषदेची धुरा कोणाच्या हाती जाते याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

    या निवडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रमुख नेतेही रायगडमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मंत्री आशिष शेलार, प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, आमदार रविशेठ पाटील तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी या निवडीवेळी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या निवडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

    जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर अलिबाग समुद्रकिनारी भाजप-राष्ट्रवादी महायुतीचा विजयी मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मेळाव्यासाठी सुमारे पाच हजार कार्यकर्ते बसू शकतील, असा मोठा मंडप उभारण्याचे कामही सुरू आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

    पंचायत समिती सभापती तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष या दोन महत्त्वाच्या निवडी सलग दोन दिवसांत होत असल्याने रायगड जिल्ह्यातील राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडीनंतर जिल्ह्यातील सत्तेची समीकरणे कोणत्या दिशेने वळतात आणि नेतृत्वाची धुरा कोणाच्या हाती जाते? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा