• Mon. Nov 25th, 2024

    Mumbai News : नाट्य संमेलन मुंबईत? शंभराव्या संमेलनाबाबत विश्वस्त शरद पवार यांची सूचना

    Mumbai News : नाट्य संमेलन मुंबईत? शंभराव्या संमेलनाबाबत विश्वस्त शरद पवार यांची सूचना

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे होणाऱ्या शंभराव्या नाट्य संमेलनाची नाट्यप्रेमींना तीन वर्षांपासून प्रतीक्षा आहे. या नाट्यसंमेलनाचा मुख्य कार्यक्रम मध्यवर्ती ठिकाणी करण्याची सूचना शुक्रवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ आणि विश्वस्त मंडळाच्या संयुक्त बैठकीत सभेचे अध्यक्ष आणि परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांनी केली. त्यानुसार हा मुख्य कार्यक्रम मुंबईत होण्याची शक्यता आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शुक्रवारी ही बैठक झाली. दरम्यान, करोनापूर्व काळात झालेल्या निवडीनुसार शंभराव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल हेच असतील, असेही या निमित्ताने स्पष्ट करण्यात आले.

    आगामी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे कार्यक्रम विभागीय पातळीवर आयोजित करण्यात येणार आहेत; तसेच मुख्य कार्यक्रम पुढील वर्षी मार्चमध्ये होणार असल्याचे या बैठकीत ठरल्याची माहिती शरद पवार यांच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली. या वेळी प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी शंभराव्या नाट्य संमेलनाविषयीच्या सूचना मांडल्या. संमेलनाची रूपरेषा आखण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या वेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाच्या नूतनीकरणाचा अहवाल सादर केला. उर्वरित कामांसाठी पुढाकार घेऊन लवकरात लवकर नाट्यसंकुल प्रेक्षकांसाठी उपलब्ध होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. यासाठी सर्व मदत करण्याचे आश्वासन विश्वस्तांतर्फे देण्यात आले.

    या बैठकीसाठी पवार यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, शशी प्रभू, गिरीश गांधी, अशोक हांडे आणि मोहन जोशी; तसेच राज्यातील नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते. कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी दुरुस्ती खर्चाचा अहवाल सभेपुढे सादर केला.

    ‘झाडीपट्टी’चे सादरीकरण

    वैदर्भीय शैलीतील नाट्य प्रकार झाडीपट्टी रंगभूमीने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. या कलाप्रकाराचे सादरीकरण महाराष्ट्राच्या इतर भागात व्हावे या संदर्भातही या वेळी चर्चा झाली. सामंत यांनी नाट्य परिषदेच्या विविध शाखांचे सक्षमीकरण करण्यात यावे, या संदर्भात सूचना केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed