Palghar-Nashik Rail Line: पालघर जिल्ह्यातील डहाणू ते नाशिकपर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी गेली अनेक वर्ष मागणी केली जात आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला वेग मिळत असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
40 वर्षांपूर्वी प्रकल्पाची मागणी
जव्हारचे तत्कालीन खासदार राजे मुकणे यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी डहाणू-नाशिक रेल्वे मार्ग उभारण्याची मागणी केली होती. मात्र, हा मार्ग आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नसल्याचे सांगत रेल्वे विभागाने तो प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता. त्यानंतर डहाणूचे खासदार चिंतामण वनगा यांनीही डहाणू-नाशिक रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला; परंतु तो मार्ग किफायतशीर नसल्याचे कारण देत रेल्वे विभागाने पुन्हा तो प्रस्ताव पुढे नेला नव्हता. त्यानंतर पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनीही या प्रश्नासाठी प्रयत्न केले; मात्र तो मार्ग व्यावसायिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचे सांगत प्रस्ताव पुन्हा धूळखात पडला.
Western Railway: ‘मिनी मॉल’, ‘कॅफे’सारख्या सुविधा रेल्वे स्थानकावरच! पश्चिम रेल्वेचं महसूल दुप्पट करण्याचं उद्दिष्ट; कसा होईल फायदा?
दरम्यान पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू ठेवला. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्यांनी डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती दिली.
मालवाहतुकीसाठी मार्ग उपयुक्त
खासदार डॉ. सवरा यांनी, कल्याण-मुरबाड या शहरी भागातील रेल्वे मार्गाचे काम सुरू केल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. तसेच बहुतांश आदिवासी आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू केल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. हा प्रकल्प आदिवासी व ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा असल्याने सर्वेक्षण कधी पूर्ण होणार आणि प्रकल्पाला मंजुरी कधी मिळणार, असा प्रश्नही त्यांनी संसदेत उपस्थित केला. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ वाढवण बंदर उभारण्याचे काम प्रस्तावित असल्याने या बंदरासाठी देश-विदेशातून येणारा कच्चा व तयार माल वाहतुकीसाठी डहाणू-नाशिक रेल्वे मार्ग उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे.
Navi Mumbai Metro: तळोजा-खांदेश्वर मेट्रोसाठी 5 हजार कोटींची तरतूद, नवी मुंबईत दुसरी मार्गिका; अनेक वर्षांनंतर मंजुरी
प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचा
डहाणू ते नाशिक या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. हा मार्ग पश्चिम घाटातून जाणार असल्याने हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचा आहे. पश्चिम घाटातील भौगोलिक परिस्थिती आणित्यातील आव्हाने लक्षात घेता अनेक तांत्रिक बाबींचा या प्रकल्पात समावेश आहे. मात्र या सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहाला दिले.
