अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग विझवली. मृत प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाने केले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासनेही घटनास्थळी पोहोचले. सध्या पाच ते सहा रुग्णवाहिका, सिंदखेड राजा, किनगाव राजा तसेच नजीकच्या पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बसमधील प्रवाशांचे मृतदेह जळून राख झाले आहेत. त्यामुळे कोणाची ओळख पटवणे कठीण झाले आहे. डीएनए चाचणीबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसच्या बसला समृद्धी महामार्गावर मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास अपघात झाला. पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, किंवा ड्रायव्हर सांगतोय, बसचे टायर फुटले. त्यानंतर गाडी पुलाला लागून घसरली, डिझेल टँक फुटून आग लागली. सगळे झोपेत होते, त्यामुळे २५ जणांचा मृत्यू झाला. केवळ सात-आठ जणांना बसमधून बाहेर येण्याची संधी मिळाली. बसमध्ये तीन लहान मुलं असल्याची माहिती आहे. मृतांची ओळख पटवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचं आव्हान आहे, असं पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांनी सांगितलं.
वेळेवर मदत मिळाली असती तर…
अपघातानंतर बसच्या मागील बाजूच्या खिडकीच्या काचांवर हात आपटत काही प्रवासी मदतीसाठी गयावया करत होते. परंतु आजूबाजूने जाणारे इतर वाहन चालक मदतीसाठी थांबले नाहीत, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. आग लागल्यामुळे आतून प्रवाशांना काचा तोडणं शक्य झालं नाही. परंतु आजूबाजूने जाणारे ट्रक, टेम्पो चालक थांबले असते, त्यांनी आपल्याकडील लोखंडी रॉडने काचा फोडण्यास मदत केली असती, तर मृतांचा आकडा कमी असता, असा दावाही काही जणांनी केला आहे.
अपघातानंतर बाहेर आलेल्या जखमी प्रवाशांनी मदत मागितली, मात्र गाड्या थांबल्या नाहीत, असाही दावा केला जात आहे. बसच्या मागील बाजूला एक महिला आपल्या बाळासह काचेवर हात आपटत सुटकेची याचना करत होती, मात्र आमच्या डोळ्यांदेखतच त्यांचा जळून कोळसा झाला, असंही एकाने सांगितलं.
अपघातग्रस्त बस विदर्भ ट्रॅव्हल्सची एसी स्लीपर कोच होती. ही बस शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. बसमध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. नागपूरहून सुटलेली ही बस रात्री साडेनऊ वाजता कारंजा येथे जेवणाचा ब्रेक घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झाली. वर्ध्यातील सावंगी बायपासहून सहा महिला आणि आठ पुरुष असे एकूण १४, नागपूरहून आठ, तर यवतमाळहून तिघे बसमध्ये होते.