प्राथमिक माहितीनुसार, कारकीन परिसरामध्ये राहणारा १३ वर्षीय मुलगा घरात पाण्यासाठी टाकीतून पाईपच्या (Water Pipe) माध्यमातून पाणी तोंडाने ओढत होता. यावेळी पाईपमध्ये मुंगळे होते. मुलाने तोंडाने पाणी ओढल्यामुळे ते हवेच्या दाबामुळे मुलाच्या तोंडात गेले. यावेळी मुलाने आरडाओरड केला असता घरातील नागरिकांनी मुलाच्या तोंडातील काही मुंगळे काढले. मात्र, बरेच मुंगळे घशात गेल्याने कुटुंबीयांनी मुलाला कांचनवाडी येथील सोहरणी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तात्काळ मुलाच्या घशाची पाहणी केली. यावेळी डॉक्टर शेखर खोबरे यांनी मुलावर उपचार सुरू केले .यावेळी दुर्बिणीच्या साह्याने स्वरयंत्रात गेलेले मुंगळे बाहेर काढण्यात यश आले. यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकला.
याबाबत डॉक्टर शेखर खोबरे म्हणाले की, मुलाने तोंडाने पाणी ओढले त्यावेळी त्याच्या तोंडामध्ये मुंगळे गेले होते. दरम्यान नातेवाईकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केल्यामुळे लवकरात लवकर त्याच्यावर उपचार करणे शक्य झाले. दुर्बिणीच्या माध्यमातून घशातील मुंगळे काढल्यानंतर मुलाला डिस्चार्ज देण्यात आला. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे असे आव्हान यावेळी डॉक्टर खोबरे यांनी केले.