• Mon. Nov 25th, 2024

    शिक्षकांच्या डोक्यावर निवडणुकीच्या कामाचे ओझे; हजर व्हा, अन्यथा कारवाई, निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

    शिक्षकांच्या डोक्यावर निवडणुकीच्या कामाचे ओझे; हजर व्हा, अन्यथा कारवाई, निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील काही शाळांतील सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर हजर होण्याचे आदेश बजावले आहेत. विद्यार्थ्यांना वर्गावर शिकवायचे की निवडणुकीच्या कामासाठी हजर व्हायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. या आदेशाची सक्ती केल्यास विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभागाच्या कार्यालयात पाठविण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.

    आगामी मुंबई महापालिका, लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम निवडणूक आयोगाने हाती घेतले आहे. त्यासाठी शिक्षकांनी या कामावर तत्काळ हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षकांना कार्यमुक्त न करणाऱ्या मुख्याध्यापकांवर, तसेच हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५०चे कलम ३२नुसार कारवाई करण्याचा इशाराही आयोगाने दिला आहे. विशेष म्हणजे शाळेचे नियमित काम संभाळून हे काम करावे लागणार असल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    शिक्षक तणावात

    ‘आमच्या शाळेत सहा वर्ग असून सात शिक्षक आहेत. शाळा सुटल्यावर कारकुनी कामे शिक्षकांना करावी लागतात. काही शिक्षक वसई आणि कल्याण येथून शाळेत येतात. त्यांनी निवडणुकीची कामे कधी करायची? सर्वच शिक्षकांना ही कामे करावी लागणार असल्याने ते तणावात आहेत,’ असे एका शिक्षकाने सांगितले.

    जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

    ‘मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी गोरेगाव येथील आय. बी. पटेल विद्यालय, मुरारराव राणे हायस्कूल, नंदादीप विद्यालय, वांद्रे येथील महात्मा गांधी हायस्कूल, मालाड येथील उत्कर्ष मंदीर या शाळांतील सर्व शिक्षकांना निवडणुकीचे काम लावले आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी दिली. सांताक्रूझ येथील राजा रामदेव पोद्दार शाळा, खार येथील गुरुनानक हायस्कूल यांसह अनुदानित शाळांतील शिक्षकांनाही हा आदेश बजावलेला आहे. या संदर्भात शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त अन्य कामे लावू नयेत, असे पत्र अभ्यंकर यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिले आहे.
    मास्तरांनो, एक चूक कराल तर कारवाईत फसाल! शाळेच्या आवारात मनमानी व्यसन करणं पडणार महागात
    ‘विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम’

    ‘निवडणुकीचे काम करणाऱ्या अतिरिक्त ५०० शिक्षकांना पालिका शाळेत पाठवेले आहे. याचाच अर्थ निवडणुकीची कामे करण्यासाठी शिक्षकांची कमतरता आहे. मुंबईतील ७० टक्के शिक्षक दोन ते अडीच तासांचा प्रवास करून कामावर येतात. अतिरिक्त कामामुळे त्यांना वर्गावर शिकवता येणार नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होईल. त्यामुळे निवडणूक कामातून शिक्षकांना मुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी व्यक्त केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *