त्याच्या विरोधात मुरगुडमध्ये मोर्चाही निघाला होता, मात्र इज्जत आणि भीतीपोटी कोणीही पुढे येऊन तक्रार देण्यास तयार नसल्याने पोलिसांनी स्वतःच गुन्हा दाखल करून ही कारवाई केली आहे. दरम्यान अटक टाळण्यासाठी सदर व्यक्तीने शर्थीचे प्रयत्न केले मात्र अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत गुन्हा दाखल केला.
काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील कागल तालुक्यातील मुरगुड गावात ही घटना समोर आली होती. येथील या बोगस डॉक्टरने महिलांशी अश्लील चाळे केल्याच्या सुमारे ७० ते ८० क्लिप व्हायरल झाल्या होत्या. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
याबद्दल मुरगुड मधील तब्बल ४०० जणांनी पत्र लिहित सदर डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या सर्व क्लिप त्या डॉक्टरने स्वत:च तयार केल्या असल्याचे बोलले जात होते. या विकृत डॉक्टरने त्याचा लॅपटॉप दुरुस्तीसाठी दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
त्याने लॅपटॉपमध्ये अनेक क्लिप संग्रहीत करून ठेवल्या होत्या. यामधील अनेक क्लिप सोशल मीडियावर पसरल्या होत्या. ज्यात बहुतांशी महिलाही स्थानिकच होत्या. यामुळे या बोगस डॉक्टरांवर कारवाई व्हावी यासाठी मुरगूड शहरात मोर्चा निघाला होता, तर शिवसेनेकडून देखील तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना निवेदन देत त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मोर्चा निघूनही कोणीच तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याने पोलिसांनी या प्रकरणात स्वत: गुन्हा दाखल केला होता.
मुरगुड शहरातील निनावी पत्रे, विविध माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या तसेच निनावी पत्रातून होत असलेल्या व्हिडीओ चित्रीकरणाची चर्चा, डॉ. कदमचे नग्न स्वरुपातील फोटोंच्या प्रसारित झालेल्या झेरॉक्स प्रती या पार्श्वभूमीवर योग्य तो तपास होण्यासाठी पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी फिर्याद दाखल केली होती. या सर्व पुराव्याच्या आधारे या बोगस डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या.
त्याला अटकेनंतर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या बोगस डॉक्टरकडून अटक टाळण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. अटकपूर्व जामीन मिळावी यासाठीही तो धडपडत होता. मात्र त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आले आहे.