• Mon. Nov 25th, 2024
    रिक्षाचालकांकडून ग्राहकांची लूट; रात्रीच्या वेळी प्रवाशांना गराडा घालून मनमानी भाडेआकारणी

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : रात्रीचा प्रवास करून बसथांब्यांवर उतरलेल्या प्रवाशांना घर गाठण्यासाठी रिक्षाशिवाय अन्य पर्याय नसतो. मात्र याचा गैरफायदा घेत, काही रिक्षाचालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचे दिसत आहे. परिवहन विभागाने अशा रिक्षाचालकांवर गांभीर्याने कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

    परगावाहून येणारे अनेक प्रवासी रात्री १२ ते पहाटे ५ या दरम्यान एसटी किंवा खासगी बसमधून, महामार्गावर उतरून आपल्या घरी जाण्यासाठी रिक्षाच्या शोधात असतात. या वेळेत, स्थानिक बस बंद असल्याने प्रवाशांना रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नसतो. मात्र यावेळी रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे न आकारता, मनमानी भाडे सांगतात. प्रत्येक बसथांब्यावर हाच प्रकार पाहायला मिळतो. रात्रीची वेळ असल्याने प्रवासीही रिक्षाचालक मागेल तितके पैसे देतात.

    मुंबई गोवा महामार्गावर बसेसची जोरदार धडक, एसटीच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा, तिघांची प्रकृती गंभीर
    नवी मुंबईतील सीबीडी ब्रिज येथून आयकर कॉलनी, किल्ले बेलापूर येथे जाणारे प्रवासी असतात. नेरूळ एलपी येथून सेक्टर नवीन ५०, सीवूड्स, करावे गाव, नेरूळ येथे जाणारे प्रवासी असतात. सानपाडा हायवे येथून पाम बीच येथील उच्चभ्रू सोसायटीकडे, तर जुईनगर रेल्वे कॉलनी आणि सानपाडा हायवे येथून घणसोली, एरोली येथे जाणारे प्रवासी असतात. या सर्वांची रिक्षाचालकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. रात्री १२ वाजल्यानंतर दुप्पट भाड्याऐवजी तिप्पट आणि त्याहूनही जास्त भाडे आकारले जाते.

    प्रवाशांना गराडा

    परगावाहून आलेले प्रवासी नवी मुंबईतील सीबीडी, नेरूळ, एलपी, जुईनगर, सानपाडा हायवे, वाशी हायवे, रबाळे नाका, कोपरखैरणे आदी ठिकाणी उतरतात. या ठिकाणी रात्रीच्या वेळी रिक्षाचालक प्रवाशांची वाट पाहत असतात. प्रवासी उतरताच रिक्षाचालक त्याला गराडा घालून हैराण करतात. प्रवाशांनी आपले जायचे ठिकाण सांगितले की, मनमानी भाडे सांगितले जाते.

    सायबर चोराचं ऐकून अ‍ॅप डाऊनलोड; निवृत्त पोलिसाला गंडा, थक्क करणारी मोडस ऑपरेंडी
    नेरूळ, एलपी येथे रात्रीच्या वेळी रिक्षाचालकांकडून लूट होत असून नवी मुंबई वाहतूक पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने यावर कारवाई करण्याची गरज आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस तैनात करावेत, अशी मागणी परिवहन विभागाकडे केली आहे. – दिलीप आमले, अध्यक्ष, शिव वाहतूक सेना, नवी मुंबई

    रिक्षाचालकांनी अतिरिक्त भाडेआकारणी केल्याची किंवा अन्य काही तक्रार असल्यास वाशी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्वरित संबंधित रिक्षाचालकावर कारवाई केली जाते. आरटीओ भरारी पथकाकडून विविध विभागांत कारवाई सुरूच असते. रात्री नेरूळ, एलपीसह इतर ठिकाणी भरारी पथक तैनात करून कारवाई करण्यात येईल. – हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed