उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील विजयालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानातील तब्बल तीन कोटी २० लाख रुपये किंमतीचे सहा किलो सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुरक्षारक्षक मागील १५ ते २० दिवसांपासून दुकानात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. चोरी करणारे आरोपी सीसीटीव्ही कैमेऱ्यात कैद झाले असून या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील शिरू चौकात विजयालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी या परिसरातील सर्व दुकाने बंद असतात. दुकाने आणि बाजारपेठ बंद असल्याचा फायदा घेत ज्वेलर्स शॉपीच्या वॉचमनने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने सोमवारी दुकान बंद झाल्यानंतर रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास दुकानात प्रवेश केला. आरोपींनी गॅस कटरचा वापर करत दुकानातील तिजोरी फोडली. त्यांनी या तिजोरीतून तब्बल तीन कोटी २० लाख रुपये इतकी किंमत असलेले सोन्याचे सहा किलो वजनी दागिने चोरी केले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्यासह गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना घटनास्थळी चार सिलेंडर आढळून आले आहेत. जवळपास सहा किलो सोने चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या घटनेच्या तपासासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. फरार आरोपींचा पोलीस तपास करत आहेत.