अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात दाखल केल्यानंतर शांताबाई यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शांताबाई या गुडघेदुखीच्या त्रासाला तोंड देत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच डोक्यावरील केसांमुळे होणारा त्रास सोडविण्यासाठी मुंडन करण्यात आले. एरवी डोक्यावरील केस म्हणजे एखाद्या महिलेसाठी सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असतो. मात्र, डोक्यावरील सर्व केस काढून टक्कल केल्यानंतरही शांताबाई थोड्याही नाउमेद झालेल्या नाहीत, त्यांचा उत्साह पूर्वीसारखाच टिकून आहे. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पुन्हा एकदा शांताबाई यांची भेट द्वारकामाई वृद्धाश्रमात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी शांताबाई कोपरगावकर यांच्या भेटीचा व नवीन लूकचा व्हीडिओ प्रसिद्ध केला आणि बघता बघता शांताबाईंच्या या नवीन लूकचा व्हिडिओ समाज माध्यमांवर सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये शांताबाई नवीन लूकमध्ये लावणी गाताना चेहऱ्याव विविध एक्सप्रेशन देताना दिसत आहे. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर छानसे हसू फुललेले दिसत आहे.
एकेकाळी तमाशाचे फड गाजवलेल्या सम्राज्ञीवर भीक मागण्याची वेळ
शांताबाई कोपरगावर यांनी आपल्या अदाकारीने एकेकाळी लालबाग परळचं हनुमान थिएटर गाजवलं होतं. आपल्या अदाकारीने आणि सौंदर्यानं चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केले होते. मात्र, उतरत्या वयात महाराष्ट्राच्या या लावणीसम्राज्ञीवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली होती. शांताबाई कोपरगावकर या पोटाची खळगी भरण्यासाठी कोपरगाव शहरात भीक मागत फिरत होत्या. दिवसभर शहरभर फिरून भीक मागून दोन वेळाची जेवणाची व्यवस्था झाल्यानंतर रात्री झोपण्यासाठी हक्काचा निवारा नसल्याने ते कोपरगाव बस स्थानक येथे येऊन झोपायच्या.