मुंबईसह पालघर, ठाणे या जिल्ह्यांसाठी मंगळवारी आणि बुधवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रायगडसाठी पुढील चारही दिवस, तर रत्नागिरीसाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तसंच सिंधुदुर्गात मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मध्य महाराष्ट्रातही पुढील ४८ तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
पुण्यात काय असणार पावसाची स्थिती?
जिल्ह्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने शुक्रवारपर्यंत (३० जून) शहर आणि घाटमाथ्यावर रोज पाऊस हजेरी लावणार आहे. सोमवारी आकाश दिवसभर ढगाळ राहणार असून, हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारनंतर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार आहे. पावसाचा जोर कायम वाढल्यास पुण्यातील जून महिन्याची सरासरी आठवडाभरात ओलांडण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या विविध भागांमध्ये रविवारी सकाळी पावसाने जोरदार हरेजी लावली. त्यानंतर मात्र जोर कमी झाला. दुपारच्या सुमारास सांताक्रूझ, खार, जुहू, वर्सोवा या भागात संततधार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली, मात्र या पावसाचा जोर फारसा नव्हता. मुंबईत सांताक्रूझ येथे रविवारी सकाळी ८.३०पासून सायं. ५.३०पर्यंत केवळ १७.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर, कुलाबा येथे ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी दिवसभर पडलेल्या पावसाचा परिणाम म्हणून मुंबईच्या कमाल तापमानात शनिवारपेक्षा घट नोंदली गेली.
दरम्यान, राज्यात शनिवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत दापोली येथे सर्वाधिक ९१.५ मिमी, महाबळेश्वर ८४ मिमी, माथेरान येथे ४५ मिमी, मुंबईत सांताक्रूझ येथे २६.५ मिमी, सोलापूर येथे ६३ मिमी, सातारा येथे १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.