• Sat. Sep 21st, 2024

बीआरटी ठरली नावापुरती, येरवडा रामवाडी मार्गाबाबत मोठा निर्णय, वाहतूक कोंडी कधी सुटणार

बीआरटी ठरली नावापुरती, येरवडा रामवाडी मार्गाबाबत मोठा निर्णय, वाहतूक कोंडी कधी सुटणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे: नगर रस्त्यावरील येरवडा ते रामवाडी दरम्यानच्या जलद बस वाहतूक सेवेच्या (बीआरटी) मार्गिकेमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अनुकूलता दर्शविल्यानंतर महापालिकेने ‘बीआरटी’ मार्ग काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरात आता फक्त सातारा रस्त्यावरच नावापुरती ‘बीआरटी’ सुरू आहे.नगर रस्त्यावर येरवडा ते ‘आपले घर’ दरम्यान ‘बीआरटी’ कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, ‘मेट्रो’च्या कामांमुळे येरवडा ते वडगाव शेरीपर्यंत ‘बीआरटी’चा मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे नगर रस्त्यावरील ‘बीआरटी’ तुकड्या-तुकड्यात सुरू होती. नगर रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असल्यामुळे ‘बीआरटी’ मार्ग बंद करा अथवा त्यामधून खासगी वाहनांना प्रवेश द्या, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’चा (पीएमपी) ‘बीआरटी’ बंद करण्याला विरोध होता. ‘बीआरटी’तून प्रवास करणाऱ्यांचा वेळ वाचत असल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यावेळी येरवडा ते रामवाडी दरम्यानची ‘बीआरटी’ योग्य नसल्याचे दिसून आले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी अनुमती दिल्यानंतर महापालिकेने शनिवारपासून ‘बीआरटी’ काढण्यास सुरुवात केली.

Weather Forecast: राज्यासह देशात मान्सूनची जोरदार एन्ट्री, मुंबई-दिल्लीत ६२ वर्षात जे झालं नाही ते घडलं
सातारा रस्त्यावरच उरली ‘बीआरटी’

देशात सर्वप्रमथ ‘बीआरटी’ सुरू झालेल्या पुण्यात आता फक्त तेवढ्याच प्रायोगिक मार्गावरील सेवा शिल्लक राहिली आहे. या ‘बीआरटी’ मार्गातही खासगी वाहनांची घुसखोरी सुरूच आहे. संगमवाडी ते विश्रांतवाडी मार्गही अर्धवट सुरू आहे. संगमवाडी ते सादलबाबा चौक दरम्यानचा ‘बीआरटी’ मार्ग काढून टाकण्यात आला आहे. आता नगर रस्त्यावरील येरवडा ते रामवाडी दरम्यानचा ‘बीआरटी’ मार्ग काढण्यात येत आहे.

नगर रस्त्यावरील येरवडा ते रामवाडी दरम्यानचा ‘बीआरटी’ मार्ग काढण्यास वाहतूक पोलिसांनी अनुकूलता दर्शविली होती. या दरम्यान ‘बीआरटी’चा मार्ग व्यवस्थित नव्हता. काही ठिकाणी बस मार्गात जात होती. काही ठिकाणी अचानक रस्त्यावर येत होती. मेट्रोच्या खांबांच्या बाजूने ‘बीआरटी’चे मार्ग व्यवस्थित होऊ शकत नसल्याचे पाहणीत आढळले. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘बीआरटी’ मार्ग काढण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अतिरिक्त ३० फूट रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. – विजय मगर, पोलिस उपायुक्त, पुणे

मुख्यमंत्री भाषण करतेवेळी व्यापाऱ्यानं थेट समस्या मांडली; शिंदेंनी शांतपणे मार्ग काढला

पीएमपीला नगर रस्त्यावरील ‘बीआरटी’ मार्गाची आवश्यकता होती. मात्र, मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी आग्रह धरला आणि महापालिकेने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या मार्गावरील ‘बीआरटी’ सेवा बंद होणार आहे. – ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed