नाशिक शहरात ८४५ होर्डिंग्ज आहेत. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु, महापालिकेच्या विविध कर विभागाने कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर ८४५ पैकी आतापर्यंत ८०४ होर्डिंग्जधारकांनी स्टॅबिलिटी सर्टिफिकेट अर्थात, कार्यक्षमता तपासणी प्रमाणपत्र सादर केले आहे. उर्वरित ४१ होर्डिंग्जधारकांची तपासणी सुरू असून, येत्या दोन-तीन दिवसांत प्रमाणपत्र एजन्सींकडून प्राप्त होईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, आता या प्रमाणपत्रांबाबतच साशंकता निर्माण झाल्याने पालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटच्या फेरपडताळणीचा निर्णय घेतला आहे.
गोपनीय अहवाल मागविला
होर्डिंग्जच्या स्टॅबिलिटी तपासणीकरिता सिव्हिल टेक, संदीप फाऊंडेशन, त्र्यंबकरोड आणि केबीटी महाविद्यालय, गंगापूररोड या तीन एजन्सींची नियुक्ती करण्यात आली होती. होर्डिंग्जधारकांनी कार्यक्षमता तपासणी प्रमाणपत्र सादर केले असले, तरी त्यातील किती होर्डिंग्जची दुरुस्ती करण्याची गरज होती, प्रत्यक्षात तशी पूर्तता केली गेली आहे का, किती होर्डिंग्ज धोकादायक आहेत, किती होर्डिंग्जची जागा बदलावी लागणार आहे, यासंदर्भातील गोपनीय अहवाल महापालिकेच्या विविध कर विभागाने तीनही एजन्सींकडून मागविला आहे.
विभागनिहाय होर्डिंग्जची संख्या
विभाग एकूण होर्डिंग
पश्चिम ३१३
पूर्व १९२
पंचवटी ९७
नाशिकरोड ९९
सिडको ७४
सातपूर ७०
एकूण ८४५
आतापर्यंत शहरातील ८४५ पैकी ८०४ होर्डिंग्जधारकांनी प्रमाणपत्र सादर केले आहे. उर्वरित ४१ होर्डिंग्जधारकांकडून येत्या दोन दिवसांत प्रमाणपत्र सादर होईल. त्याचबरोबर होर्डिंग्जची तपासणी करणाऱ्या तीनही एजन्सींकडून गोपनीय अहवालदेखील मागविण्यात आला आहे.-श्रीकांत पवार, उपायुक्त, विविध कर विभाग, महापालिका