• Sat. Sep 21st, 2024
भाज्यांचे दर कडाडले; आवक मंदावल्याने टोमॅटो, मिरचीसाठी मोजावी लागतेय इतकी किंमत

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून जाधववाडी येथील बाजार समिती आवारात भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. परिणामी, टोमॅटो, दोडके, अद्रक, हिरवी मिरचीसह अन्य भाजीपाल्याचे दर वधारले आहेत.जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात स्थानिक, शेजारी जिल्ह्यासह परराज्यातून शेती नियमित मालाची आवक होते. गेल्या काही दिवसांपासून या ठोक बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. परिणामी, भाव तेजीत असल्याचे घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले. किरकोळ बाजारात याचे चांगलेच परिणाम दिसून येत असून गेल्या आठ दिवसाच्या तुलनेत अपवाद वगळता जवळपास सर्वच भाजीपाल्याचे दर वाढल्याचे विक्रेते नरहरी येवलेकर यांनी सांगितले.

sambhajinagar news : विना हेल्मेट ‘या’ कंपन्यांत ‘नो एन्ट्री’; शहरात १५० आस्थापनांमध्ये लावले फलक
अद्रकाचा दर आलेख चढताच असून १८० ते २०० रुपये किलो या दराने त्याची विक्री होत असल्याचे त्यांनी नमूद केले. लसणाच्या भावातही तेजी असून १०० ते १२० रुपये प्रति किलो असा दर आहे तर गावरान लसणाचे दर किलोमागे १६० ते १८० रुपयांच्या घरात आहे.

आवक घटल्याने टोमॅटो चांगला भाव खात आहे. काही दिवसापूर्वी २० ते २५ रुपये किलोने मिळणाऱ्या टोमॅटोसाठी ग्राहकांना सध्या ५० ते ६० रुपये मोजावे लागतात. बटाट्याचे दर स्थिर कायम असून १५ ते २० रुपये प्रती किलो दराने त्याची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. हिरवी मिरचीही चांगली कडाडली आहे. ५० रुपये प्रति किलोने मिळणाऱ्या मिरचीचे भाव ७० ते ८० रुपयांच्या घरात गेले आहेत. तर दोडकेचे भावही ७० ते ८० रुपये प्रति किलो असून ४० रुपयांना मिळणाऱ्या वांग्यासाठी ग्राहकांना ६० ते ७० रुपये मोजावे लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
टायपिंग येत नाही, मग पगार कसला? महापालिका प्रशासकांनी घेतली लिपिकाची हजेरी, पालिकेत झाडाझडती
यासह फ्लॉवर तसेच चवळी शेंगा ५० ते ६० रुपये प्रती किलो, भेंडी ३० ते ४० रुपये, दुधी भोपळा, पत्ताकोबी २० ते २५ रुपये, गवार तसेच शिमला मिरचीचे दर ४० ते ५० रुपये किलो, काकडी ४० ते ५० रुपये, कारले, शेवगा शेंगा ६० रुपये तर कांदा १० ते १२ रुपये प्रती किलो असे दर असल्याचे विक्रेत्यांनी नमूद केले. लिंबाच्या दरात किलोमागे काहीशी घसरण झाली असून ५० ते ६० रुपये दराने त्याची विक्री होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पालेभाज्याची आवक मंदावल्याने दर वधारले असून मेथी, कोथिंबीरची एक जुडी १५ ते २० रुपयांना तर पालकाच्या एका जुडीसाठी ८ ते १० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed