• Mon. Nov 25th, 2024

    ताडोब्यातील पर्यटन महागणार! १ जुलैपासून प्रवेश शुल्क हजारांच्या घरात; मोजावे लागणार इतके रुपये

    ताडोब्यातील पर्यटन महागणार! १ जुलैपासून प्रवेश शुल्क हजारांच्या घरात; मोजावे लागणार इतके रुपये

    म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : मागील पावणे चार महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. पण आता प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये पर्यटन करताना व्यवस्थापनाने १ जुलैपासून प्रवेश शुल्क दुप्पट केले आहे. यामुळे पर्यटकांवर एक ते दोन हजार रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.या उन्हाळ्याच्या सुट्यांचा पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला असून पर्यटकांनी व्याघ्रदर्शनासाठी पसंती दर्शविली आहे. राज्यात प्रख्यात असणारा ताडोबा-अंधारी प्रकल्प हा व्याघ्र पर्यटनात राज्यात पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. ताडोब्यात मागील साडेतीन महिन्यात सुमारे १ लाखांहून जास्त पर्यटकांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली. पण आता व्यवस्थापनाने प्रवेश शुल्कात वाढ केली आहे. ताडोबा व्यवस्थापनाने प्रथमच जिप्सीमध्ये ‘सीट-शेअरिंग सिस्टम’ सुरू केली आहे. एका प्रौढ व्यक्तीसाठी याची किंमत दीड हजार रुपये असेल आणि ‘सिंगल बेंच’ची किंमत चार हजार राहणार आहे. ज्यामध्ये दोन प्रौढ आणि मुले असे तीन व्यक्ती असतील.

    आता आठवड्याच्या दिवशी एकाच सफारीची किंमत ५ हजार १२५ रुपये असेल तर शनिवार व रविवार आणि सरकारी सुटीच्या दिवशी ६ हजार १२५ रुपये असेल. शुल्कांमध्ये १ हजार ७०० रुपये प्रवेश शुल्क, २ हजार ७०० रुपये जिप्सी, ६०० रुपये मार्गदर्शक शुल्काचा समावेश असेल. ‘वीकेंड’ला २ हजार ७०० रुपये प्रवेश शुल्क होणार आहे. पूर्वी, आठवड्याच्या दिवशी एकाच सफारीची किंमत ४ हजार १२५ रुपये होती. ‘वीकेंड’ आणि सरकारी सुटीचे शुल्कही सारखेच होते.

    मार्गदर्शक आणि जिप्सी मालकांकडून शुल्क वाढवण्याची प्रलंबित मागणी होती. जर तुम्ही दरांचा विचार केला तर ते स्वस्त आहे, कारण कोणतीही व्यक्ती १ हजार ५०० मध्ये सफारीचा आनंद घेऊ शकेल. आम्ही ते ऑनलाइन देखील केले असल्याचे उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक यांनी सांगितले. शनिवारी संध्याकाळपर्यंत ‘सीट-शेअरिंग बुकिंग’ ला चांगला प्रतिसाद आहे. तब्बल ४० टक्के व्याघ्रप्रेमींनी त्याला प्रतिसाद दिला असल्याची पुष्टी त्यांनी जोडली.

    विठ्ठल मंदिरात व्हिआयपी दर्शन बंद, मुखदर्शन सुरू राहणार; पालकमंत्र्यांची माहिती

    कोअर क्षेत्रातही प्रवेश शुल्क वाढणार

    १ जुलैपासून ताडोबाच्या सहा गेटचे कोअरचे दरवाजे बंद होणार आहेत. त्यानंतर ते १ ऑक्टोंबरपासून खुले होतील. त्यावेळी कोअर क्षेत्रातही पर्यटन महागणार असल्याचे संकेत आहेत. २०१६ पासून प्रवेश शुल्कात अद्यापही वाढ झाली नव्हती. ती आता वाढणार आहे. वाढणारा महसूल हा स्थानिक गावाच्या विकासासाठी खर्च होईल. स्थानिकांना त्याचा फायदा होणार असून यात पर्यटकांचे योगदान या माध्यमातून राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *