छत्रपती संभाजीनगर : वैजापूर शहरातील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामात मानवी सांगाडा आढळून आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तहसील कार्यालयाची इमारत ही निजामकालीन असून स्वातंत्र्याच्या पूर्वी या इमारतीचे बांधकाम झाले असल्याने इमारत १३० वर्षांहून अधिक जुनी आहे. त्यामुळे या परिसरात आढळून आलेल्या मानवी सांगड्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये असलेल्या तहसील कार्यालयाजवळ नवीन तहसील कार्यालयाचे भूमिपूजन गेल्या महिन्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार रमेश बोरनारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अनेक नेत्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयाचे भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.

नवीन तहसील कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी याठिकाणी जुनाट जीर्ण निजामकालीन इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. नव्या इमारतीच्या बांधकामासाठी कंत्राटदाराने जेसीबीद्वारे खोदकाम सुरू केले होते. मात्र गुरुवारी खोदकाम सुरू असताना तेथील मजुरांना जमिनीत मानवी सांगाडा आढळून आल्यामुळे जेसीबी चालकाने खोदणे बंद केले.
दरम्यान, या प्रकाराची महिती बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता काकड यांना देण्यात आली. तसेच मानवी सांगाडा आढळल्याची महिती सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसील कार्यालयाला कळवली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शेख, विशाल पडळकर व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली. यासोबतच तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार कुलकर्णी, तलाठी पेहरकर यांनीही भेट दिली. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.