या प्रकरणी अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एक चाळीस वर्षीय महिला पतीसह राहत होती. तिला तीन मुलं आहेत. मात्र पतीचं निधन झालं, त्यानंतर ती प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये शिर्डी येथे राहण्यासाठी गेली. यातून महिलेला मुलगा झाला. मात्र आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे चार मुलं सांभाळणं त्या महिलेला शक्य नव्हतं.
महिलेने छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवशंकर कॉलनीत असलेल्या जिजामाता बालक आश्रमात मुलाला देण्याचा निर्णय घेतला. मात्र आश्रम चालवणारे श्रीहरी राऊत व त्याची पत्नी सविता राऊत यांनी दोन महिन्याच्या चिमुकल्याला तब्बल पाच लाख रुपयांमध्ये विकल्याची धक्कादायक बाब भरोसा सेलच्या कारवाईमध्ये उघडकीस आली होती. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये मुलाची आई, आश्रम चालवणारे पती-पत्नी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील मुलाच्या आईला जवाहरनगर पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये बोलावले होते. यामध्ये मुलाच्या आईने हे अपत्य स्वतःचंच असल्याची कबुली दिली. पतीच्या निधनानंतर एका व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. त्यातून गर्भवती राहिल्यानंतर शिर्डी येथील लोणी येथील रुग्णालयामध्ये प्रस्तुती झाली. त्यानंतर मुलाला दत्तक देण्याचा निर्णय तिने घेतला असल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये नोंदवले आहे.