म. टा. प्रतिनिधी, मुंबई : रेल्वेने स्थानकांमध्ये सीसीटीव्ही आणि १५१२ क्रमांकाची हेल्पलाइन कार्यान्वित केल्याने गुन्ह्यांची उकल होण्याचा टक्का वाढला आहे. सन २०१९च्या तुलनेत यंदाच्या पाच महिन्यांत गुन्ह्यांची १८ टक्के अधिक उकल करण्यास रेल्वे पोलिस यशस्वी ठरले आहेत.जानेवारी ते मे, २०२३ या पाच महिन्यांत मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयात ६४२५ गुन्ह्यांची नोंद झाली. यापैकी २४३८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. सन २०१९मधील पहिल्या पाच महिन्यांत ३३ हजार ८१५ गुन्ह्यांची नोंद झाली होती व यातील ६७९४ गुन्ह्यांचा गुंता सोडवण्यात आला आहे. २०१९मध्ये गुन्हा उकल करण्याचे प्रमाण २० टक्के होते. रेल्वे पोलिस हेल्पलाइन, महिला डब्यांमध्ये पोलिस तैनात, स्थानकांदरम्यान संवेदनशील जागेवर गस्त अशा उपाययोजना रेल्वे पोलिसांनी राबवल्या आहेत. यामुळे २०२३मधील पाच महिन्यांत गुन्हे उकल करण्याचे प्रमाण ३८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकलमधून प्रवास करताना मोबाइलसह चोरीच्या अन्य घटना वारंवार घडतात. दरोडा, अपहरणाच्या गुन्ह्यांतही वाढ झाली होती. रात्री उशिरा एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या छेडछाडीच्या घटनाही सातत्याने घडत होत्या. या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत. निवडक सीसीटीव्हीमध्ये चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान असल्याने गुन्हा घडल्यावर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना मोठी मदत मिळत आहे. १५१२ क्रमांकाच्या हेल्पलाइनच्या माध्यमाने प्रवाशांना रेल्वे स्थानकातच मदत मिळत असल्याने प्रवासी त्याचा वापर करीत आहेत.

मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयातील निवडक गुन्ह्यांचा आढावा
गुन्ह्यांची नावे २०२३(गुन्हे-उकल-टक्का) २०१९ (गुन्हे-उकल-टक्का)
दरोडा : १६२-१३९-८६ १,५४८-१,३६९-८८
चोरीच्या घटना : ६,०९८-२१७४-३६ ३१,५८२-४९५२-१६
विनयभंग : ३८-३७-९७ १५०-१३७-९१
दुखापत : २९-२३-७९ ७६-५५-७२
अपहरण : २२-१७-७७ ३६-३३-९२
(स्रोत : मुंबई लोहमार्ग पोलिस)
जानेवारी ते मे, २०१९
एकूण गुन्ह्यांची नोंद : ३३,८१५
गुन्हे उकल : ६७९४
गुन्हे उकल होण्याचे प्रमाण : २० टक्के
जानेवारी ते मे, २०२३
सर्व गुन्ह्यांची नोंद : ६४२५
गुन्हे उकल : २४३८
गुन्हे उकल होण्याचे प्रमाण : ३८ टक्के