• Sat. Sep 21st, 2024
उत्तनचा कचरा पुन्हा पेटणार; मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांकडून आयोजित बैठक निष्फळ

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : कचरा प्रकल्पात साठलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पात नव्याने कचरा टाकण्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या संदर्भात चर्चेसाठी पालिका आयुक्तांकडून मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र यावेळी कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने संघर्षाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात उत्तनचा कचरा पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.मिरा-भाईंदरमध्ये दररोज तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उत्तनमधील धावगी डोंगरावर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात लाखो घनमीटर कचरा प्रक्रियेअभावी मागील अनेक वर्षांपासून पडून आहे. यातून पसरणाऱ्या दुर्गंधीचा त्रास स्थानिक रहिवाशांना मागील अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे. यात, कचऱ्याला आगींमुळे भर पडते. २००८ साली प्रकल्प सुरू झाल्यापासून दुर्गंधी व आगीच्या धुरासह इतर अनेक प्रश्नांना स्थानिक रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकल्पामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मान्सून अपडेट: शेतकऱ्यांसाठी पुढील ८ दिवस चिंतेचे, कृषी आयुक्तांकडून महत्त्वपूर्ण माहिती
कचरा प्रकल्पाचा प्रश्न सोडवण्यासाठी वर्षभरापूर्वी आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यानंतर आयोजित बैठकीत विविध आश्वासने देण्यात आली होती. त्यांचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत प्रकल्पात नव्याने कचरा टाकण्यात येऊ नये, अशी भूमिका ग्रामस्थांच्या विविध संघटनांनी घेतली होती. तसे पत्राद्वारे पालिका प्रशासनाला कळवण्यात आले होते. या संदर्भात चर्चा करण्यासाठी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुख्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांनी कचरा प्रकल्पामुळे त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचून दाखवला. यासह वर्षभरापूर्वी देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात न आल्याने नाराजी व्यक्त केली.

यावेळी, येत्या वर्षभरात नवीन बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर उत्तन प्रकल्पात ओला कचरा प्रक्रिया करण्यासाठी टाकला जाणार नाही. पावसाळा संपल्यानंतर साठलेल्या कचऱ्यावर संपूर्ण प्रक्रिया करून उद्यान विकसित करू, अशी आश्वासने प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. मात्र ठोस कारवाईबाबत एकही आश्वासन यात नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी संघर्षाची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे कचरा प्रश्नावर आयोजित करण्यात आलेली ही बैठक निष्फळ ठरली. याबाबत लवकरच बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

Mumbai Local: पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; आज या पाच लोकल रद्द, कारण…
कोट्यवधींची यंत्रे धूळ खात

कचरा प्रकल्पातून पसरणाऱ्या दुर्गंधीतून उत्तनवासींची सुटका करण्याच्या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिका प्रशासनाने दोन फवारणी यंत्रे खरेदी केली आहेत. या यंत्रांच्या मदतीने कचऱ्यावर सुगंधी द्रव्य फवारणीचे काम केले जाणार आहे. मात्र ही यंत्रे प्रकल्पात जाखल जाली असली, तरी अनेक महिन्यांपासून ती सुरू करण्यात आलेली नाहीत. कोट्यवधी रुपये किंमतीची ही यंत्रे धूळखात पडून असल्याचे स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed