• Sat. Sep 21st, 2024

ठाणेकरांना रस्त्याने चालणंही झालं कठीण; पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत स्ट्रीट क्राइममध्ये वाढ

ठाणेकरांना रस्त्याने चालणंही झालं कठीण; पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत स्ट्रीट क्राइममध्ये वाढ

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : रस्त्यांवरील वाढत्या गुन्हेगारीमुळे (स्ट्रीट क्राइम) ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना भयमुक्त वातावरणात वावरणे कठीण झाले आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सोनसाखळी तसेच मोबाइल खेचण्याचे प्रकार अद्याप सुरूच आहेत. जूनमध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि इतरही ठिकाणी चोरीचे डझनभर गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.गंभीर बाब म्हणजे, चोरांकडून मारहाण होण्याचे प्रसंगही घडले आहेत. वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा आलेखही वर सरकत असताना ही गुन्हेगारी रोखण्याकडे ठाणे पोलिसांकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरांनी हौदोस मांडला असून पोलिसांकडून प्रभावीपणे गस्त घातली जात नसल्याचे बोलले जात आहे.

दोन वर्षांपूर्वी ठाण्यातच दुचाकीवरील चोरांनी रिक्षातील एका महिला प्रवाशाचा मोबाइल खेचल्यानंतर तो परत मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये ही महिला रिक्षामधून तोल जाऊन पडली आणि तिचा मृत्यू झाला होता. या महिलेच्या मृत्यूनंतर तरी मोबाइल चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. मोबाइल चोरांचा बंदोबस्त करण्यामध्ये पोलिस अपयशी ठरले असून चोरीच्या गुन्ह्यांची लवकर उकलही होत नाही. परिणामी, आरोपी मोकाट राहून वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे करत असल्याचे सांगितले जाते.

मोबाइल खेचण्याच्या प्रकारांबरोबर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याच्या प्रकारांमुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. सोनसाखळी चोरांमुळे पायी चालणे महिलांना अवघड झाले आहे. दुचाकीवरुन आलेले चोर महिलांच्या गळ्यातील दागिने खेचत असून हे प्रकार ठाणे परिसरात विविध शहरांत हे घडत आहे. त्यामुळे पायी जाणे किंवा वाहनाने प्रवास करणे सुरक्षित राहिलेले नाही. १ जूनपासून मोबाइल आणि सोनसाखळी चोरीचे डझनभर गुन्हे आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल झाले आहेत. यामध्ये मोबाइल चोरीचे नऊ आणि सोनसाखळी चोरीच्या तीन गुन्ह्यांचा समावेश आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली या शहरांतील हे गुन्हे आहेत. काही गुन्ह्यांमध्ये संबधित व्यक्तीला चोरांनी मारहाण तसेच हल्ला करून मोबाइलची चोरी केली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर वाहने चोरीला जात असून अनेक वाहनांचा महिनोंमहिने शोधच लागत नाही. त्यामुळे ही वाहने जातात कोठे, हादेखील प्रश्न आहे. कारच्या काचा फोडून कारमधील किमती वस्तूंची चोरी होत असल्याने या गुन्ह्यांना कधी आळा बसणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालखी सोहळ्यात चोरट्यांची चांदी; आणखी ४ घटना उघडकीस, सव्वा दोन लाख किंमतीचे दागिने गायब
ठाणेकरांची सुरक्षा वाऱ्यांवर

सहा वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोलिसांना पायी गस्त घालण्याची सूचना दिली होती. लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाह सोनसाखळी चोरी तसेच छेडछाडीच्या प्रकाराला आळा बसावा, तसेच नागरिकांशी सुंसवाद साधता यावा आणि गुन्हेगारांवर जरब बसावा, हा पायी गस्त घालण्यामागचा प्रमुख उद्देश होता. पोलिस आयुक्तांच्या सूचनेनंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता मनुष्यबळ कमी असल्याने सर्वच ठिकाणी गस्त घालणे शक्य होत नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed