भारत राष्ट्र समितीच्या नागपूरमधील कार्यालयाचे उद्घाटन चंद्रशेखर राव यांच्या हस्ते झाले होते. नांदेड, सोलापूर, सांगली, संभाजीनगर नंतर नागपूरमध्ये पक्ष वाढीवर भर देण्यात आला आहे. ठिकठिकाणी पक्ष कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांत काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपमधील काही मंडळींनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. भारत राष्ट्र समितीच्या विस्ताराची प्रारंभी फारशी चर्चा नव्हती. पण अन्य पक्षांमधील नेत्यांचा प्रवेश व पक्ष कार्यालये उघडण्यात येत असल्याने भारत राष्ट्र समितीचे अस्तित्व जाणवू लागले आहे. सांगली, सोलापूर, चंद्रपूरसह विविध भागांमध्ये चंद्रशेखर राव यांची मोठी पोस्टर्स लागलेली दिसू लागली आहेत.यातच शहऱी भागात सुद्धा भारत राष्ट्र समितीचे बॅनर आणि त्यावर राव यांचा फोटो झळकू लागले आहेत. ग्रामीण भागाबरोबर आता शहरातही राव यांचे बॅनर लागल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. ठाणे जिल्हातील उल्हासनगर शहरात राव यांचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे भारत राष्ट्र समितीचे लोण आता शहरी भागात येऊन पोचले आहे का, असा आता उपस्थित केला जात आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळं प्रस्थापितांना त्यांच्या या आव्हानाची काळजी वाटू लागलीये. पक्ष कार्यालयं स्थापन करणं, इतर पक्षांमधील नेत्यांना आपल्या पक्षात घेणं असा कार्यक्रम राव यांनी सुरू केलाय. यानंतर आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातही बीआरएस पक्षानं बॅनरबाजी केलीये. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात बीआरएस पक्षाचे बॅनर लागले आहेत. उल्हासनगरच्या नेताजी चौकात हे बॅनर लावण्यात आले असून विशेष म्हणजे या बॅनरच्या बाजूलाच शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे बॅनर लागले आहेत. त्यामुळं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात येऊन त्यांना आव्हान दिल्याची चर्चा यानंतर रंगली आहे.
२०१४पासून तेलंगणमध्ये सत्तेत असलेले चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्षविस्ताराची मोहीम नांदेडमधून सुरू केली. हैदराबादच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (एआयएमआयएम) पक्षाने २०१४मध्ये महाराष्ट्रात नांदेडमार्गेच प्रवेश केला. पुढे उदगीर, छत्रपती संभाजीनगरमध्ये बस्तान बसवले होते. चंद्रशेखर राव यांच्या पक्षविस्ताराच्या आक्रमक धोरणाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तेलंगणात चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना सुरु केल्या. त्या लोकप्रिय ठरल्या होत्या. हीच गोष्ट महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीच्या पथ्थ्यावर पडणार का, हे आगामी काळात पाहावे लागेल.