• Sun. Mar 15th, 2026

    पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण; केंद्रीय सचिव नीलम शमी राव यांनी केली पाहणी – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 13, 2026
    पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण; केंद्रीय सचिव नीलम शमी राव यांनी केली पाहणी – महासंवाद

    अमरावती, दि. १३ ( जिमाका ):  अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र, नांदगाव पेठ येथे नव्याने विकसित होत असलेल्या ‘पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क’ला आज भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी भेट देऊन पाहणी केली. देशातील सात राज्यांमध्ये विकसित होणाऱ्या टेक्सटाईल पार्क्सपैकी अमरावती येथील पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी यावेळी विशेष समाधान व्यक्त केले. या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र शासनाचे उद्योग सचिव मा. डॉ. पी अन्बलगन, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. एकूण 1 हजार 20 एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या या पार्कमध्ये रस्ते, सांडपाणी निचरा व्यवस्था, केबलिंग, पथदिवे, पाणीपुरवठा यंत्रणा आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्णतः कार्यान्वित झाले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पात 100 एकर क्षेत्रावर एमआयडीसीतर्फे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच, या प्रकल्पात नेदरलँडमधील ‘मेसर्स टिटिवायएम मॅनेजमेंट बी.व्ही.’ या कंपनीद्वारे कापूस प्रक्रिया आणि संशोधन व विकास केंद्र स्थापन करण्यासाठी 66 एकर जमिनीवर पहिली परकीय गुंतवणूक करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

    दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील एकूण औद्योगिक विकास आणि या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर निर्माण होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील रोजगाराच्या संधींविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग संचालक अनिल कुमार, सहसंचालक विनय मिश्रा आणि नागपूरचे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये एमआयडीसी नागपूरचे मुख्य राजेश झंझाड यांनी आभार मानले.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed