‘छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले राजे आहेत. भारतातील मुसलमान हे औरंगजेबाचे वंशज नाहीत. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित मुसलमान औरंगजेबाला मान्यता देत नाही. तरीही बाळासाहेबांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन महिमामंडन करणे कितपत योग्य आहे? अॅड. आंबेडकर यांच्यासोबत युती करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारला. आता यावर प्रकाश आंबेडकर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खुलताबादमध्ये असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीला आणि मारुती मंदिराला भेट दिली होती. यापैकी आंबेडकर यांची औरंगजेबाच्या कबरीला दिलेली भेट वादग्रस्त ठरली होती. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन तणाव निर्माण होण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीवर गेल्याने वादंग निर्माण झाला होता. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी तेव्हाच औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्या संघटनांना फटकारले होते.
औरंगजेबावरुन वाद निर्माण करणाऱ्यांनी प्रथम स्वत:चचे चारित्र्य बघावे. तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात कामाला होतात की नाही, तिकडे नोकऱ्या करायचात की नाही, हे सांगावे. आम्ही तर दरबारात साधे चोपदारही नव्हतो. त्यामुळे लोकांना शहाणपण शिकवताना प्रथम आपला इतिहास तपासावा, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना फटकारले होते. तसेच औरंगजेबाची कबर हा इतरांसाठी वादाचा विषय असला तरी अनेक लोकांची या स्थळावर श्रद्धा आहे. आपली श्रद्धा आहे की नाही, हा वेगळा भाग आहे. ज्याला मानायचं आहे, त्यांनी मानावं, ज्यांना नाही मानायचं त्यांनी मानू नये. पण मानणाऱ्या आणि न मानणाऱ्यांनी एकमेकांचा अपमान करु नये. लोकांच्या या श्रद्धेचा मान आपण राखला पाहिजे, त्याचा आदर झाला पाहिजे. सरकारनेही या श्रद्धेचा अपमान करु नये, असे आम्हाला वाटत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.