पालिका आणि रेल्वे प्रशासन सर्व संबंधित यंत्रणांशी योग्य समन्वय राखून वेगाने या प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या प्रकल्पाच्या गतीवर पालिका आयुक्त तसेच प्रशासक इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे लक्ष ठेवून आहेत. वेलरासू हे प्रकल्पास नियमित भेटी देऊन कामाचा आढावा घेत आहेत.
या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये सुमारे १ हजार २५० टन वजनाचा गर्डर महत्त्वाचा असून या गर्डरसाठी १ हजार २७० मेट्रिक टन पोलाद (स्टील) खरेदी करण्यात आले आहे. गर्डरची २५ टक्क्यांपेक्षा अधिक जुळवाजुळव (फॅब्रिकेशन) अंबाला येथील कारखान्यात पूर्ण झाली आहे. गर्डर बांधणीचे काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असून ठरलेल्या वेळेत ते पूर्ण होईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने जुना पूल पूर्णपणे तोडून २८ मार्च २०२३ रोजी प्रकल्पाचे काम पालिकेकडे हस्तांतरित केले. तेव्हापासून आत्तापर्यंत या पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे तब्बल ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामदेखील लवकरच पूर्ण होईल. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेच्या वाहतुकीला अडचण येऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने पर्यायी मार्ग सुरळीत ठेवले आहेत. भुयारी मार्गांमध्ये पावसाळ्यात पाण्याचा जलद गतीने निचरा व्हावा म्हणून पंपांची व्यवस्था केली आहे.
यंत्रणांसोबत समन्वय
पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि इतर सर्व संबंधित यंत्रणांसोबत नियमित समन्वय राखला जात आहे. कितीही अनपेक्षित समस्या उद्भवली, तरी एखादा पंधरवडा किंवा फारतर एक महिन्यापेक्षा अधिक वेळ न दवडता विक्रमी वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा झटते आहे, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.