म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहर स्वच्छतेसाठी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. अधिकारी आणि स्वच्छतेच्या कामावरील कर्मचारी यांच्यात संपर्क राहावा, यासाठी ६०० वॉकिटॉकी सेट खरेदी केले जाणार आहेत अशी माहिती श्रीकांत यांनी दिली.स्वच्छतेच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगर शहर क्रमांक एक चे शहर असावे, या दृष्टीने जी. श्रीकांत यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून स्वच्छता निरीक्षकापर्यंत काम करणाऱ्या सुमारे ३० जणांची टीम त्यांनी इंदूरला पाठवली होती. ‘या शहराचे घनकचरा व्यवस्थापन कसे आहे याचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे आपल्या शहरात कामाला सुरुवात करा,’ असे त्यांनी सर्वांना सांगितले आहे.
त्याबाबत अधिक माहिती देताना जी. श्रीकांत म्हणाले, ‘स्वच्छतेच्या कामासाठी प्रत्येक अधिकारी आता रस्त्यावर उतरतील. रोज किमान दोन तास त्यांनी शहर स्वच्छतेच्या कामासाठी दिले पाहिजेत असे सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना घरे वाटून दिली जाणार आहेत. अधिकारी व स्वच्छतेच्या कामावरील कर्मचारी यांच्यात संपर्क आणि समन्वय राहावा यासाठी ६०० वॉकिटॉकी सेट खरेदी केले जाणार आहेत. वॉकिटॉकी सेट केवळ स्वच्छतेच्या कामासाठी वापरले जाणार नसून, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी त्याचा उपयोग होईल. स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्थापन यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष लवकरच उभारला जाईल.’

‘स्वच्छतेबद्दल जनजागरण मोहीमदेखील राबवली जाणार आहे. जे दुकानदार कचरा रस्त्यावर टाकतात, त्यांना रस्त्यावर कचरा न टाकण्याबद्दल प्रथम समजावून सांगितले जाईल. त्यानंतर दुकान सील करण्याची कारवाई केली जाईल,’ असे जी. श्रीकांत म्हणाले.
सलून वेस्टची गंभीर दखल
‘सलून वेस्ट घंटागाडीमध्ये टाकले जात आहे, ही गंभीर बाब आहे,’ असे जी. श्रीकांत यांनी सांगितले. ‘सलून वेस्ट बायोमेडिकल वेस्ट म्हणून गृहीत धरले जाणार आहे. याबद्दल सलून असोसिएशनची बोलून सूचना दिल्या जातील. सलून वेस्ट घंटागाडीत टाकणे योग्य नाही,’ असे त्यांनी नमूद केले.