पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज साने याने बोरिवली येथील एका दुकानातून कीटकनाशक विकत घेतले होते. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मनोजला या दुकानात नेले होते. दुकानदाराने मनोज आपल्या दुकानातून कीटकनाशक घेऊन गेल्याचे सांगितले. या दुकानातून विकण्यात आलेल्या कीटकनाशकाचे नाव आणि बॅच क्रमांक हा मनोज सानेच्या फ्लॅटमध्ये सापडलेल्या केमिकलशी जुळणार आहे. त्यामुळे मनोजने याच दुकानातून कीटकनाशक विकत घेतल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती आहे.
मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे दोघेजण २०१४ पासून एकत्र राहतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते. काही डेटिंग अॅप्सवर मनोज साने याची अकाऊंटस होती. ही गोष्ट सरस्वती सानेच्या लक्षात आल्यामुळे ती त्याच्यावर संतापली होती. त्यामुळे मनोज आणि सरस्वती यांच्यात सतत भांडणे व्हायची. ३ जून रोजी दोघांमध्ये अशाच कारणावरून भांडण झाले. त्यावेळी सरस्वती मनोजला म्हणाली की, ‘तू आता माझ्याशी पूर्वीसारखा वागत नाहीस’. त्यानंतर सरस्वतीने मनोजला बेडरुममधून बाहेर काढले. त्यामुळे संतापलेल्या मनोजने सरस्वती वैद्य हिला ठार मारले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
मनोज सानेनं ताकातून सरस्वतीला कीटकनाशक पाजलं
पोलिसांच्या माहितीनुसार, मनोजने ४ जूनला सरस्वती हिची हत्या केली. मनोजने १५ दिवसांपूर्वी दुकानातून कीटकनाशकाची बाटली विकत आणली होती. हे कीटकनाशक ताकात मिसळून त्याने सरस्वतीला दिले. यानंतर मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले. या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मनोजने हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि भाजले होते. मांस आणि हाडं वेगळी करण्यासाठी आपण मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवल्याचे मनोजने पोलिसांनी सांगितले होते. ७ जून रोजी सानेच्या शेजाऱ्यांना त्याच्या घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली होती. मनोजने मृतदेहाची दुर्गंधी लपवण्यासाठी घरात रुम फ्रेशनर मारले होते. याशिवाय, मृतदेहाला निलगिरीचं तेल लावलं होतं. पोलिसांना मनोजनच्या फ्लॅटमध्ये निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या सापडल्या.