नवी मुंबईतील महापे येथे अशाच प्रकारे हप्ते वसुली करत असल्याची घटना समोर आली आहे. महापे येथे राहणारे नागेश लिंगायत आणि त्यांची पत्नी आरती हे दोघे वडापावची गाडी लावून आपला उदरनिर्वाह चालवतात. याच परिसरात असणारे स्थानिक गुंड त्यांना धमकावत होते. “या ठिकाणी वडापावची गाडी लावायची असेल तर चार हजारचा हप्ता द्यावा लागेल”, असं त्यांना धमकावले. परंतु जोडप्याने त्याला हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना त्या स्थानिक गुंडाकडून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणावरून नागेश लिंगायत आणि त्यांची पत्नी आरती लिंगायत यांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार केली आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली.
नागेश लिंगायत हे महापे येथील हनुमान नगर येथे राहत असून ते नोकरी करत होते. मात्र, नोकरी करून येणाऱ्या पैशांमध्ये घर खर्च भागत नव्हता, वाढत्या महागाईचा विचार करून पत्नी आरतीने आपल्या पतीला साथ देण्यासाठी महापे मिलेनियम बिजनेस पार्क बस स्थानकाच्या बाजूला वडापावची गाडी चालू केली. व्यवसाय सुरू करून आरतीला फक्त चार ते पाच दिवस झाले होते. त्याच परिसरात असणार स्थानिक गुंड महेंद्र पाटील उर्फ मोट्या गुरुवारी दि. ८ रोजी नागेश लिंगायत यांच्या घरी पोहोचला आणि आरती आणि तिच्या पतीकडे हप्त्याची मागणी करू लागला. तसेच जोडप्याला धमकावण्याचा प्रयत्न करू लागला. “वडापावची गाडी लावायची असेल तर महिन्याला चार ते पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. तसेच पोलिसांना देखील मी घाबरत नाही, तुम्ही कुणालाही सांगितले तरी तुम्हाला हप्ता द्यावा लागेल”, असं बोलून तो निघून गेला.
महेंद्रने धमकी दिल्याच्या दोन दिवसानंतर महापे परिसरातील चहाच्या दुकानांमध्ये नागेश लिंगायत आणि त्यांचे काही मित्र चहा पीत होते. त्यावेळी महेंद्र तिथे आला आणि नागेश लिंगायत यांना मारहाण करू लागला. ही माहिती मिळताच नागेश यांची पत्नी लगेच घटनास्थळी दाखल झाली आणि तिने महेंद्रला अडवण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र, महेंद्रने नागेश यांच्या पत्नीला देखील मारहाण केली.
नागेश यांनी याबाबत तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी नागेश यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी महेंद्र पाटील याचा तात्काळ शोध सुरू केला. शोध घेऊन देखील तो सापडला नाही. मात्र, रविवारच्या रात्रीच्या सुमारास तो घरी आल्याचे समजताच पोलीस पथक थेट त्याच्या घरी पोहोचलं आणि महेंद्रला अटक केली.
यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक करत नागरिकांनी अशा गुंडांचा अन्याय सहन न करता थेट पोलिसांकडे तक्रार करावी, असं आव्हान केलं आहे.
नवी मुंबई शहारामध्ये अनेक ठिकाणी असे हफ्ते वसुली करण्याचे प्रकार सुरू असून ह्या हफ्ते वसुली करणाऱ्यांवर कडक कारवाई केली तर हप्ते वसुलीचे प्रकार थांबतील.