• Sat. Sep 21st, 2024
खडकवासला धरण साखळीने गाठला तळ; पुणेकरांना पाणीटंचाईची भीती

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्यााला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात सध्या फक्त पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी शिल्लक राहिले आहे. जिल्ह्यातील एकूण ३१ धरणांपैकी बहुतांश धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत जिल्ह्यात पाऊस न झाल्यास पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. जून महिना सुरू झाल्यानंतर नागरिकांसह शेतकरीही आता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही काही भागांत अवकाळी पावसानेच हजेरी लावली आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून पुणे शहराला पिण्यासाठी; तसेच ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. या चारही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.‘खडकवासल्या’त एक टीएमसी पाणी

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत बुधवारी (१४ जून) ५.०५ टीएमसी (१७.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. खडकवासल्यामध्ये १.०३ टीएमसी, पानशेतमध्ये १.३५ टीएमसी, वरसगाव धरणामध्ये २.५३ टीएमसी आणि टेमघरमध्ये ०.१३ टीएमसी पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठाही घटून १.७६ टीएमसीवर गेला आहे.
विविध प्रकल्प सल्लागारांवर लाखोंचा चुराडा; खर्च करुनही प्रकल्प अपूर्ण, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रकार

जिल्ह्यातील धरणांतील साठा घटला

पुणे जिल्ह्यात ३१ धरणे असून, बहुतांश धरणांनी तळ गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही, तर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. नीरा उजवा काल्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे. नीरा डाव्या कालव्यातून येत्या २१ जूनपर्यंत शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यानंतर शिल्लक पाणी पिण्यासाठी वापरले जाईल. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाण्याचे १५ जुलैपर्यंत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शिल्लक पाणीसाठ्याचे नियोजन केले जाईल, असेही जलसंपदा विभागाने सांगितले.

धरणांतील पाणीसाठा

धरण उपयुक्त साठा (टीएमसी) टक्के :

खडकवासला – १.०३ ५१.९९
पानशेत – १.३५ १२.७१
वरसगाव – २.५३ १९.७५
टेमघर – ०.१३ ३.५९
पवना – १.७६ २०.६४
भामाआसखेड – १.९८ २५.५७
मुळशी – १.०८ ५.३४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed