• Mon. Nov 25th, 2024

    राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात CM शिंदेंची तोफ धडाडली, दीड लाख नागरिकांना दिली आनंदाची बातमी

    राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात CM शिंदेंची तोफ धडाडली, दीड लाख नागरिकांना दिली आनंदाची बातमी

    म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : महाविकास आघाडी हे स्पीड ब्रेकर सरकार होते, पण अकरा महिन्यात डब्बल इंजिन सरकारने ते सर्व स्पीड ब्रेकर हटवले, ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ हा पायंडा खोडून काढला, म्हणून तर हे वेगवान आणि गतीमान सरकार लोकप्रिय ठरले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

    कोल्हापुरात प्रचंड गर्दीत झालेल्या ‘शासन आपल्या दारी ’ या कार्यक्रमात शिंदे यांनी गतीमान निर्णयाचा आढावा घेत हे सरकार राज्याला प्रगतीपथावर आणि विकासाकडे नेत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील दीड लाखावर लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यात आली. पन्नास हजारावर लाभार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहिले. यामुळे तपोवन मैदान गर्दीने खचाखच भरले होते.

    कानाच्या प्रकृतीच्या कारणामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला. याला राजकीय किनार असल्याने कार्यक्रम ठिकाणी चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक खासदार, आमदार उपस्थित होते.

    शेट्टी–माने दुरंगी लढत की जयंत पाटलांची एन्ट्री होणार? भाजपची वेगळीच चाल, प्लॅनही तयार!
    मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे, जिव्हाळ्याचे निर्णय घेत आहोत. अडीच वर्षात महाविकास आघाडीने एकही सिंचन प्रकल्प उभारला नाही, पण आम्ही अकरा महिन्यात २९ प्रकल्पांना मंजूरी दिली. शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय त्यांनी घेतला, पण अंमलबजावणी आम्ही केली. हे सरकार अन्नदाता, मायबाप असलेल्या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे, त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. परकीय गुंतवणुकीत आपले राज्य मागे पडले होते, आता ते पुन्हा नंबर एकवर आले आहे. हे राज्य नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे यासाठी लहान मोठे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यासाठी इतिहासात कधी घेतले नव्हते, एवढे धाडसी निर्णय आम्ही घेत आहोत.’

    मुख्यमंत्री म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री फडणवीस व मी सर्व मंत्र्यांच्या सहायाने धाडसी निर्णय घेत आहोत. दोन दिवसापूर्वी एक सर्व्हे आला. त्यामध्ये आम्हाला दोघांना पसंती दिली आहे. हे श्रेय केवळ दोघांचे नाही. सर्व मंत्रिमंडळ आणि केंद्र सरकारचे आहे. कारण आमचा प्रत्येक प्रस्ताव केंद्रात मंजूर होता. त्यामुळे प्रचंड विकास निधी मिळतो.

    प्रारंभी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री केसरकर, मंत्री सामंत यांनी विकासकामांची माहिती दिली. यावेळी अनेक लाभार्थ्यांना मदतनिधीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास खासदार प्रा. संजय मंडलिक, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील, प्रकाश आबिटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आभार मानले.

    कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी आपण मुख्य न्यायाधिशांबरोबर चर्चा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *