• Mon. Nov 25th, 2024
    वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नाही, आळंदीत काय घडलं? फडणवीसांनी एक एक करुन सगळं सांगितलं

    नागपूर : आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं आहे. आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठ्या उगारल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते.

    देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

    आळंदी येथील घटनेसंदर्भात ते माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त ढगे पाटील आणि सर्व मानाच्या दिंडीचे प्रमुख यांची एक बैठक झाली आणि गेल्यावर्षीसारखी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की प्रत्येक मानाच्या दिंडीला ७५ पासेस देण्यात याव्यात. त्यानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आले.

    मंदिरात प्रवेशासाठी आग्रही, पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट, लाठ्याही उगारल्या, कोल्हे-भुजबळ संतापले
    मात्र काही स्थानिक तरुणांनी मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडी झटापट झाली. आता परिस्थिती संपूर्णपणे शांत असून पोलिस स्थानिकांशी चर्चा करीत आहेत. आम्ही सुद्धा गांभीर्याने याची दखल घेतली आहे. काही माध्यमांनी याचे वृत्तांकन करताना फार मोठा लाठीमार अशा बातम्या दिल्या, माझी माध्यमांना विनंती आहे की जे झाले नाही, त्यातून जनतेत क्षोभ निर्माण होईल, असे काही करू नका.

    गेल्यावर्षी चेंगराचेंगरी झाली, त्या घटनेचे आम्ही राजकारण केले नाही, माझे राजकीय पक्षांना सुद्धा आवाहन आहे की त्यांनी वस्तुस्थिती समजावून घ्यावी. वारकऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. अशाही स्थितीत त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed